मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाच्या जबाबदारीतून पळ काढू नका, घेतल्याशिवाय राहणार नाही

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला सुनावले

मुंबई ,३१ मे /प्रतिनिधी:-

मराठा समाज मागास असल्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर या समाजाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने लागू केलेले आर्थिक मागासांचे दहा टक्के आरक्षण मिळणे स्वाभाविक होते. पण ते आरक्षण देऊन राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळवून देण्याच्या जबाबदारीतून पळ काढू नये, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी दिला. 

मराठा समाजाचा समावेश आर्थिक मागास आरक्षणात केल्यानंतर जबाबदारी संपली म्हणून महाविकास आघाडी सरकार पळ काढणार असेल तर ते खपवून घेणार नाही. मराठा समाजाला पुन्हा स्वतंत्र आरक्षण मिळविल्याशिवाय राहणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला. 

चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आरक्षण दिल्यानंतर सुनावणीत महाविकास आघाडी सरकार गायकवाड आयोगाच्या अहवालाची मांडणी योग्य रितीने करू शकले नाही आणि या अहवालाचा बचाव करण्यातही त्यांना अपयश आले. परिणामी सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड आयोग फेटाळला आणि मराठा समाज मागास आहे, हा मुद्दाही त्यासोबत गेला. मोदी सरकारने लागू केलेले आर्थिक मागासांचे दहा टक्के आरक्षण हे अन्य कोणतेही आरक्षण नसलेल्या घटकांसाठी आहे. मराठा समाज मागास नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने ठरविल्यानंतर आता मराठा समाजाला आर्थिक मागासांच्या आरक्षणाचा लाभ मिळणे स्वाभाविक आहे. तसे आरक्षण देऊन महाविकास आघाडी सरकारने काही विशेष केलेले नाही. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळेपर्यंत दिलासा म्हणून आर्थिक आरक्षणाचा लाभ ठीक आहे. परंतु, त्यानिमित्ताने ठाकरे सरकारने मराठा समाजाला पुन्हा स्वतंत्र आरक्षण मिळवून देण्याच्या जबाबदारीतून पळ काढण्याचा प्रयत्न करू नये.

त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर त्या निर्णयाच्या विरोधात फेरविचार याचिका दाखल करण्याचा पर्याय राज्य सरकारच्या हातात आहे. त्यासाठी ४ जूनची मुदत आहे. तथापि, आजपर्यंत महाविकास आघाडीने फेरविचार याचिका दाखल केलेली नाही. उलट सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास करणाऱ्या समितीला ७ जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळवून देण्यासाठी तातडीने राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करून त्याच्याकडून पुन्हा मराठा समाजाच्या मागासलेपणाचा योग्य अहवाल मिळवणे गरजेचे आहे. तथापि, मागासवर्ग आयोगाचे गठन करण्यासाठीही महाविकास आघाडी सरकार पावले टाकत नाही. आमच्या सरकारने गठन केलेल्या आयोगाची मुदत संपल्यानंतर सुमारे सव्वा वर्षे महाविकास आघाडी सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाचे गठन केलेले नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सवलती दिल्या होत्या. आरक्षण गमावल्यानंतर मराठा समाजाला फडणवीस सरकारप्रमाणे पुन्हा सवलती द्याव्यात अशी मागणी माझ्यासह अनेक नेत्यांनी केली परंतु, त्याबद्दल महाविकास आघाडी सरकार चकार शब्द काढत नाही. मराठा समाजासाठी जबाबदारीने स्वतः काही करण्याच्या ऐवजी केवळ केंद्र सरकारने आर्थिक मागासांना दिलेल्या आरक्षणात मराठा समाजाचा समावेश करण्याचेच फक्त काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचा स्थगितीचा निर्णय होईपर्यंत ज्या मराठा तरूण तरूणींची आरक्षणाच्या आधारे नोकरीतील निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यांची नेमणूक करण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. तरीही महाविकास आघाडी सरकार त्यांना नियुक्ती देण्यास का दिरंगाई करत आहे, असा सवाल त्यांनी केला.