जागतिक रक्तदाता दिवस

कार्ल लँडस्टेनर यांचा जन्मदिवस म्हणजे जागतिक रक्तदाता दिवस

सन २००४  मध्ये जागतिक आरोग्य संघटना, रेड क्रॉस, रेड क्रेसेंट सोसायटीचे आंतरराष्ट्रीय फेडरेशन यांनी १४ जून रोजी सर्वप्रथम “रक्तदाता दिवस” साजरा केला. जागतिक आरोग्य संघटना, रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट सोसायटी (Red Crescent Societies), आंतरराष्ट्रीय फेडरेशन आँफ ब्लड डोनर ऑर्गनायझेशन (IFBDO) आणि  इंटरनॅशनल सोसायटी आँफ ब्लड ट्रान्सफ्यूजन इम्यूनो हिमॅटोलॉजी (ISBTl) या सारख्या हेल्थ केअर एजन्सीज संयुक्तपणे आंतरराष्ट्रीय संघटना आयोजित करतात. जागतिक स्तरावर लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रम करतात. सन २००४ च्या सुरुवातीला स्वस्थ व्यक्तीने स्वेच्छेने आणि न चुकता केलेले रक्तदान हे समाजात आवश्यक लोकांची जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने सुरु केले होते.

जागतिक रक्तदाता दिवस अधिकृतपणे जागतिक आरोग्य संघटनेने सन १९५२ मधील १९२ सदस्यांसह सन २०५ मध्ये ५८ व्या जागतिक आरोग्य परिषदेत स्थापन केला. या वर्षीचे स्लोगन “Give Blood And Make World A Healthier Place. रक्तदान करा आणि जगाला एक आरोग्यदायी स्थान बनवा.” हे आहे.

डॉ. कार्ललँडस्टेनर यांचा परिचय : रक्तगटाचा जनक डॉ. कार्ललँडस्टेनर यांचा जन्म १४ जून १८६८ साली  व्हिएन्ना, ऑस्ट्रेलिया येथे झाला. कार्ल लँडस्टेनर यांचे शिक्षण व्हिएन्ना (ऑस्ट्रेलिया) येथील शाळेत झाले. सुरुवातीपासूनच त्यांना वैद्यकीय शिक्षणाबद्दल उत्सुकता होती. त्यामुळे त्यांनी व्हिएन्ना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊन १८९१ साली कार्ललँडस्टेनर यांना वैद्यकीय पदवी मिळाली. वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी जीवरसायन शास्त्रातील मुलभूत प्रक्रियांचा खास अभ्यास केला.

डॉ. कार्ललँडस्टेनर यांनी अन्नाचा रक्तातील घटकांवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करून आपल्या संशोधकांचा पाया रचला. पुढील पाच वर्षे रसायनशास्त्राचा अभ्यास करीत त्यांनी इमिल, फिश्चर, वुझबर्ग व बँम्बर्गर, म्युनिच अशा संशोधकांसोबत अभ्यास करून झुरीच येथील हेन्ट्स प्रयोगशाळेत संशोधन केले. पुढे त्यांनी व्हिएन्ना येथील सार्वजनिक रुग्णालयात नोकरी केली व तेथेच आरोग्य विज्ञानाचा अभ्यास सुरु केला. सन १८९६ मध्ये मॅक्स ग्रुबूर यांचे सहायक म्हणून डॉ. कार्ल लँडस्टेनर यांची नियुक्ती झाली.

ABO रक्तगटाचा जनक :- शरीरात रक्त व त्यांचे इतर घटक यामुळेच शरीरातील अनेक प्रक्रिया चालतात. सर्व शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा रक्तपेशींमुळेच होतो. शिवाय रोगप्रतिकारशक्तीही रक्तातील लढवय्या पेशींमुळे चालू असते. मानवाच्या शरीरात ए, बी, एबी, ओ असे चार प्रकारचे रक्तगट असतात. तसेच आर. एच. फॅक्टर पॉझिटिव्ह व निगेटिव्ह असे दोन प्रकार आहे.

ए,बी, ओ या रक्तगटाचा शोध डॉ. कार्ल लँडस्टेनर यांनी १९०० साली लावला. तसेच आर. एच. फॅक्टर शोध आणि सन १९०९ साली पोलिओ विषाणूचा शोध लावून त्यांनी जगात प्रसिद्धी मिळविली. त्यांच्या या शोधासाठी योगदानाबद्दल त्यांना १९३० साली आरोग्य व औषधशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.  याचबरोबर १९०२ साली ‘एबी’ या रक्तगटाचा शोध डिकास्टेलो आणि स्टर्ली यांनी लावला. सन १९४० साली डॉ. कार्ल लँडस्टेनर व ए.एस. व्हिनेर (Weiner) यांनी Rhesus नावाच्या माकडांमध्ये एक विशेष प्रकारचे प्रतिजन सापडले. त्याला Rh (आर एच) फॅक्टर असे नाव दिले. अशा प्रकारे डॉ. कार्ल लँडस्टेनर यांच्या योगदानाबद्दल त्यांना “रक्तगटाचा जनक” म्हणतात.

रक्तदात्यांमध्ये कोरोना विषाणूची भीती व लॉकडाऊन : देशभरात सुरु असलेल्या कोरोना विषाणूमुळे देशात तसेच महाराष्ट्रात लॉकडाऊनची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. याचा परिणाम माणसाचे आरोग्य व मानसिकतेवर झाला. याचा परिणाम रक्तपेढ्यांवरसुद्धा झाला. त्यामुळे रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवू लागला. रक्तपेढीत रक्तसाठा अत्यंत कमी प्रमाणात होऊ लागला. रुग्णालयात रक्ताची कमतरता भासू लागली.  रक्तदात्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे आयोजकांनी रक्तदान शिबिरे रद्द केली. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे जनतेला रक्तदानासाठी आवाहन करीत होते. रुग्णालयात थॅलेसिमिया, हिमोफिलिया, अपघातग्रस्त, तातडीच्या शस्रक्रिया, एड्स, कॅन्सर, अॅनेमिया इ. आजाराच्या रुग्णांना रक्ताची गरज भासू लागली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच शासनस्तरावर केलेल्या आवाहनाला साथ देत लॉकडाऊनच्या काळात तसेच आजच्या परिस्थितीत आपण तसेच रक्तदात्यांनी जर पुरेशी काळजी  व सोशल डिस्टन्सिंगचा योग्य वापर करून रक्तदान केल्यास रक्तदात्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. तेव्हा अशा जनजागृतीपर रक्तदात्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा योग्य वापर करून रक्तदान शिबीरे सुरू होऊ लागली.

राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दररोज ४  ते ५ हजार रुग्णांना रक्ताची गरज भासते. मानवी रक्ताला दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे रक्तदाता हा रुग्णांसाठी महत्त्वाचा दुवा ठरतो. याकरिता सोशल डिस्टन्सिंग व योग्य काळजी घेऊन रक्तदान शिबीर आयोजित करून रुग्णांना सुरक्षित रक्तपुरवठा केला जाऊ शकतो. यासाठी रक्तदात्यांनी योग्य काळजी व सोशल डिस्टन्सिंगचा योग्य वापर करून रुग्णांसाठी जवळच्या अथवा आयोजित ऐच्छिक रक्तदान शिबिरात पुढाकार घेऊन स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकीची जोपासावी.

१४ जून डॉ. कार्ल लँडस्टेनर यांचा जन्म दिवस. हा “जागतिक रक्तदाता दिवस” म्हणून  जगात तसेच आपल्या देशात साजरा केला जातो. कोरोना विषाणूची भीती न बाळगता योग्य काळजी घेऊन व सोशल डिस्टन्सिंग ठेवून ‘रक्तदाता’ म्हणून समाजाप्रती सामाजिक बांधिलकी जोपासून रक्तदान करावे, हे नम्र आवाहन..!

हेमकांत सोनार

जिल्हा रुग्णालय रक्तपेढी

अलिबाग-रायगड
मो.9511882578

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *