बारावीचा निकाल ; राज्याचा निकाल ९०.६६ टक्के ,औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी (८८.१८ टक्के)

See the source image

औरंगाबाद : राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागलेल्या बारावीचा निकाल अखेर १६ जुलैला जाहीर झाला. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून निकाल पाहता येणार आहे. राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक ९५.८ टक्के लागला आहे तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी (८८.१८ टक्के) आहे. मागील वर्षीच्या तुलनेत निकाल ४.७८ टक्क्यांनी वाढला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल आज अधिकृत संकेतस्थळावरून जाहीर करण्यात आला. निकालाची एकूण टक्केवारी 90.66 इतकी असून, तो मागील वर्षीच्या तुलनेत 4.78 टक्के वाढला आहे. मागील वर्षी हा निकाल 85.88 टक्के लागला होता, तर यंदाही विद्यार्थिनींनीच बाजी मारली आहे.

यंदाच्या वर्षीदेखील मुलींनीच बाजी मारली असून मुलींचा एकूण निकाल ९३.८८ टक्के तर मुलांचा ८८.०४ टक्के इतका लागला आहे. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. राज्यभरात एकूण १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली होती. बारावीच्या परीक्षेला १४ लाख १३ हजार विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १२ लाख ८१ हजार ७१२ उत्तीर्ण झाले आहेत.

सर्व मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 93.88 टक्के असून, विद्यार्थ्यांचा निकाल 88.04 टक्के इतकाच आहे. अर्थातच ही टक्केवारी विद्यार्थिनींपेक्षा 5.84 टक्क्यांनी कमी आहे.
 
फेरपरीक्षार्थी…

बारावी परीक्षेला मंडळांमधून सर्व शाखांमधील एकूण 86 हजार 739 विद्यार्थ्यांनी फेरपरीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 86 हजार 341 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 33 हजार 703 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी 39.03 इतकी आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 93.57 टक्के लागला आहे, हे उल्लेखनीय.
 
 
विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक लागला असून, त्याची टक्केवारी 96.93 इतकी आहे. कला शाखा 82.63 टक्के, तर वाणिज्य शाखेचा निकाल 91.27 टक्के लागला आहे. तसेच, एकूण 154 विषयांची परीक्षा घेण्यात आली. यात 26 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. दरम्यान, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत मिळणे, पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना 17 ते 27 जुलै या कालावधीत संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहे. शिवाय यासंबंधीचे शुल्क याच ठिकाणावरून भरण्याची सोय आहे. उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत मिळवण्यासाठी 400 रुपये, गुणपडताळणीसाठी 50 रुपये आणि पूनर्मूल्यांकनासाठी 300 रुपये भरावे लागणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी मंडळाच्या कार्यालयात येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *