उमरगा रुग्णालयात  कंत्राटी वॉर्डबॉयला  मारहाण  

कोरोनाच्या अतिदक्षता विभागात कोरोनाचे नातेवाईक आलेच कसे ? 

उमरगा ,८ मे /प्रतिनिधी 
 येथील उपजिल्हा रुग्णालयातील  कोरोना अतिदक्षता विभागातील रुग्णाच्या नातेवाईकांनी ,कोरोना रुग्णाच्या ऑक्सिजन सिलेंडर बाबत तक्रार करत  वॉर्डबॉयला  (कंत्राटी) मारहाण केल्याच्या निषेधार्थ शनिवारी कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. या  प्रकरणी पोलिस ठाण्यात  अद्याप गुन्हा नोंद झाला नाही . मात्र कोरोनाच्या अतिदक्षता विभागात कोरोनाचे नातेवाईक आलेच कसे ? यानिमित्ताने ही  गंभीर बाब समोर आली आहे . 
येथील उपजिल्हा रूग्णालयातील कोविड सेंटरमधील ,अतिदक्षता विभागातील रुग्णाच्या नातेवाईकांनी ऑक्सिजन सिलेंडर बाबत तक्रार करत कर्तव्यावर असलेल्या सिस्टरला  धमकावले व वॉर्डबॉयला मारहाण केल्याच्या निषेधार्थ शनिवारी  कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला.ही  घटना शनिवारी पहाटेची असून नातेवाईक अतिदक्षता विभागात पहाटे काय करीत होते हा प्रश्न निर्माण झाला आहे . 
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. अशोक बडे, कोविड रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. विक्रम आळंगेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात रात्रपाळीला कर्तव्यावर असलेल्या अधिपरिचारिका व वॉर्डबॉयला  कांबळेवाडी (ता.बस्वकल्याण) येथील दशरथ गोविंदराव कांबळे या  रुग्णांच्या नातेवाईकांनी  ऑक्सिजन सिलेंडर बाबत तक्रार करत धमकावण्यात आले. वॉर्डबॉयला   मारहाण करण्यात आली. हे प्रकरण अत्यंत धक्कादायक असुन रुग्णालयीन कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करणारे आहे. यामुळे रुग्णालयीन सेवा देण्यास अत्यंत अडचणी निर्माण होत आहेत. या  प्रकरणात अधिकाऱ्यांनी लक्ष घालुन कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण करत दमदाटी, धमकी देणारे, मारहाण करणाऱ्या संबंधीत व्यक्तीवर योग्य ती प्रशासकीय  कारवाई   करावी असे निवेदनात म्हटले आहे. 
निवेदनावर सर्व डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.याबाबतीत  रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना तक्रार दिली किंवा नाही याची माहिती मिळू शकली नाही . कारण वैद्यकीय अधीक्षक हे चार दिवस झाले रजेवर असल्याची माहिती आहे . 
दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात एक कायमस्वरूपी पोलिस  चौकी असावी अशी मागणी करण्यात येत असून ,या ठिकाणी कोरोना रुग्णाचा अतिरिक्त दबाव असतो .