राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने १ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीला

मुंबई ,३० एप्रिल /प्रतिनिधी

महाराष्ट्रात कोरोना वाढत असताना लसीकरण युद्धपातळीवर होणे अत्यंत आवश्यक आहे. १८ ते ४४ वयोगटासाठी राज्याला लस विकत घ्यावी लागणार आहे. त्याचा खर्च राज्याला करावा लागणार आहे. राज्यावरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी सर्वांनीच पुढे आले पाहीजे या भावनेतून राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने आज १ कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

विधानसभा आणि विधान परिषद सदस्य आणि तसेच राज्यातील सर्व खासदारांचे एक महिन्याचे वेतन मिळून आणखी एक कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांना देण्यात येईल, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच सर्वप्रथम राज्याच्या आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला व कोरोनासोबतच्या लढाईत मृत्युमुखी पडलेल्या राज्यातील आरोग्य सेवा, पोलिस दल व शासकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत आमदार-खासदारांचे एक महिन्याचे वेतन तसेच राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टतर्फे एक कोटी रुपये इतका मदतनिधी देण्यात यावा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व कोषाध्यक्षांना दिल्या.

Image

दिरंगाई न होता तातडीने ही मदत मिळावी यासाठी पवारसाहेबांनी एका कागदाच्या कोपऱ्यावर स्वतःच्या हस्ताक्षरात या सूचना लिहून पाठवल्या.रुग्णालयात असतानाही पवारसाहेब सातत्याने कोरोना परिस्थितीचा आढावा घेत होते. रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा तुटवडा असो किंवा लसीकरणातली अडचणीची परिस्थिती असो वा ऑक्सिजन पुरवठ्यासंबंधात निर्माण झालेली आपत्कालीन स्थिती असो रुग्णालयात असतानाही पवारसाहेब रोज परिस्थितीचं अवलोकन करत होते. नव्या आव्हानात्मक परिस्थितीत राज्याच्या तिजोरीवर पडलेला ताण साहेबांच्या ध्यानात आला आणि त्यांनी रुग्णालयातून घरी परतल्यावर पक्षसहकाऱ्यांना तातडीने मदतनिधीसंबंधीच्या सूचना दिल्या.

लसीकरणासाठी मदत व्हावी यासाठी राष्ट्रवादीकडून एकूण दोन कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येत आहे. ज्यांना शक्य आहे, ज्यांना लसीचा खर्च परवडणार आहे अशा नागरिकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करून राज्यावरील आर्थिक भार कमी करावा, असे आवाहनही जयंत पाटील यांनी यावेळी केले.