परभणी : कोरोनामुळे जिल्हा कोषागार अधिकारी सुनील वायकर यांचे निधन

परभणी,२४ एप्रिल /प्रतिनिधी

 येेेथील जिल्हा कोषागार अधिकारी सुनील वायकर यांचे आज आज, (24 एप्रिल) पहाटे ५ वाजता कोरोनामुळे निधन झाले. १५ एप्रिल रोजी अत्यवस्थ वाटल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्या पश्चात पत्नी व लहान मुलगी असा परिवार आहे. 
     जिल्हा कोषागार कार्यालय, परभणी येथे कोषागार अधिकारी या पदी कार्यरत असलेले सुनील कोंडीबा वायकर यांचा जन्म २ एप्रिल १९६८ चा असून, ते २ मे १९९५ रोजी, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ब लेखाधिकारी या पदावर सेवेत दाखल झाले. कालांतराने त्यांना गट अ पदी पदोन्नती मिळाली होती. त्यांच्या एकूण 26 वर्षांच्या सेवकाळामध्ये त्यांनी कोषागार कार्यालय उस्मानाबाद, बीड, श्री.तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर, स्थानिक निधी लेखा बुलढाणा, जिल्हा परिषद वाशीम, जिल्हा कोषागार कार्यालय परभणी इ ठिकाणी लेखाधिकारी, अप्पर कोषागार अधिकारी, सहाय्यक संचालक, कोषागार अधिकारी अशा विविध पदांवर सेवा बजावली. मनमिळाऊ आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख असलेले वायकर हे ९ जुलै २०१९ रोजी कोषागार अधिकारी परभणी या पदी रुजू झाले होते. त्यांच्या सुस्वभावी व प्रेमळ वागणुकीमुळे ते कोषागार कर्मचाऱ्यांचे लाडके अधिकारी होते. त्यांच्या अकाली निधनाने जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचारी वृंद शोकाकुल झाला आहे. दरम्यान, ३१ मार्च अर्थात आर्थिक वर्षाच्या ताळेबंद अनुषंगाने त्यांनी जिल्हा कोषाधिकारी पदाची संपूर्ण दक्षता घेऊन जबाबदारी पार पाडली होती. परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.