लॉकडाऊन हा अंतिम पर्याय,राज्यांनी पण शेवटचा पर्याय ठेवावा – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली,२० एप्रिल /प्रतिनिधी 

पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर करोना संसर्गास प्रारंभ झाला आहे. मात्र, आता टाळेबंदीपासून देशास वाचवायचे आहे. राज्यांनी मायक्रोकंटेनमेंटवर जास्तीतजास्त भर द्यावा आणि टाळेबंदी हा शेवटचा पर्याय असावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केले.

Narendra Modi_1 &nbs

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. यावेळी त्यांना डॉक्टर, नर्सेस यांचे आभार मानले. त्यांनी विविध सामाजिक संस्थांचे देखील आभार मानले. संकट काळात देशातील लोकांनी पुढे येऊन गरजू लोकांना मदत करावी. असं आवाहन देखील त्यांनी केलं. 

‘देश दिवसरात्र काम करत आहे. गेल्या काही दिवसात अनेक महत्त्वाची पाऊलं उचलण्यात आली आहे. ऑक्सीजनची मागणी प्रचंड वाढली आहे. यावर काम सुरु आहे. राज्यात नवे ऑक्सीजन प्लांट लावण्यात येत आहेत. औद्योगिक क्षेत्रातील ऑक्सीजन मेडिकलसाठी वापरण्यात येत आहे. औषधांचं उत्पादन वाढवलं आहे. प्रोडक्शन वाढवण्यासाठी कंपन्यांची मदत घेतली जात आहे. आपल्या देशात मजबूत फार्मा सेक्टर आहे. रुग्णालयात बेडची संख्या वाढवण्याचा काम सुरु आहे. विशाल कोविड रुग्णालयं बनवली जात आहेत.’

देशातील काही भागात निर्माण झालेली ऑक्सिजन तुटवड्याची समस्या आता सुटत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले, ऑक्सिजनचे उत्पादन आणि त्याचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी केंद्र सरकार अनेक उपाय करीत आहे. त्याचप्रमाणे आवश्यक त्या औषधांचा तुटवडा भासू नये यासाठी देशातील औषधनिर्मिती उद्योग अहोरात्र मेहनत करीत आहेत. देशातील धोका जास्त असेलल्या वयागटांचे लसीकरण यशस्वी होत असून आता १८ वर्षांवरील प्रत्येकासाठी लसीकरण सुरू करण्यात येत आहे. गतवर्षापेक्षा यंदाच्या वर्षी भारताची स्थिती अतिशय मजबूत असून आरोग्य व्यवस्थाही सुदृढ झाली आहे. त्यामुळे आता जनभागिदारी आणि जनता पाळत असलेल्या मर्यादांद्वारे करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेस परतावून लावायचे आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

करोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट मोठे संकट निर्माण झाले असले तरीदेखील त्या संकटाचा प्रत्येकाने धैर्याने सामना करावयाचा आहे. कोणत्याही परिस्थितीत पुन्हा देशव्यापी टाळेबंदीचा निर्णय घेण्यात येणार नाही. राज्यांनी मायक्रोकंटेनमेंट झोन निर्माण करून संसर्ग कमी करण्याचा प्रयत्न करावा आणि टाळेबंदी हा अंतिम पर्याय ठेवावा. नागरिकांचे प्राण वाचविण्यास प्राधान्य देतानाच अर्थव्यवस्थेचे चक्रदेखील सुरू राहिल, यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि उद्योगजगत सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

‘भारतात कोरोनावरील सर्वात स्वस्त वॅक्सीन विकसित झाली. लसीकरणात गती वाढली आहे. सरकारी रुग्णालयात मोफत वॅक्सीन मिळेल. जीवन वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आर्थिक व्यवहार कमीत कमी प्रभावित करण्याचा प्रयत्न आहे. श्रमिक वर्गाला ते आहेत तिथेच राहण्याचा विश्वास राज्यांनी दिला पाहिजे.’

स्वच्छ भारत अभियानात माझ्या बालमित्रांनी जनजागृती करण्यात मोठी भूमिका बजावली होती. त्यामुळे आतादेखील त्यांनी आपल्या घरातील कोणताही व्यक्ती विनाकारण आणि काम नसताना घराबाहेर पडणार नाही, असे वातावरण तयार करावे. कारण तुमचा तसा हट्ट अतिशय महत्वाचा ठरणार आहे.’विनाकारण घराच्या बाहेर पडू नका. प्रसारमाध्यमांनी देखील सतर्क आणि जागृत करण्याचा प्रयत्न आणखी वाढवावा. अफवा आणि भ्रम यामध्ये लोकांनी येऊ नये. लॉकडाऊनपासून वाचायचं आहे. मायक्रो कंटेंमेंट झोनवर लक्ष्य केंद्रीत करायचं आहे. मर्यादांचं पालन करावे हाच श्रीरामांचा विचार आहे. कोरोनाच्या विरुद्ध लढा जिंकण्यासाठी अनुशासन महत्त्वाचं आहे.’ असं देखील पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील लस उत्पादकांशी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  देशभरातील लस उत्पादकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. लस उत्पादकांनी बजावलेली कामगिरी आणि त्यांच्या व्यावसायिकतेबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्या लस  उद्योगाची  सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्याचे ‘सामर्थ्य, संसाधन आणि सेवा भाव’ आहे आणि यामुळेच ते  जगातील आघाडीचे लस उत्पादक बनले आहेत.

आपल्या लस  उत्पादकांच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले, सरकारने आता 1 मे पासून प्रत्येक सज्ञान व्यक्तीसाठी लसीकरण कार्यक्रमाला परवानगी दिली आहे. आपल्या लोकांचे लसीकरण करण्यासाठी लस उत्पादकांनी  कमीतकमी वेळेत लस उत्पादन क्षमता सातत्याने वाढवावी असे आवाहन त्यांनी केले. नवीन  लसींच्या विकासासाठी वैज्ञानिकांनी केलेल्या प्रयत्नांची व अभ्यासांची त्यांनी प्रशंसा केली.

पंतप्रधान मोदींनी  विक्रमी वेळेत  लस विकसित करून त्याचे उत्पादन  करण्याचे श्रेय त्यांना  दिले. येथे उत्पादित लस स्वस्त आहेत याकडे लक्ष वेधून पंतप्रधान मोदी म्हणाले की, जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम भारतात सुरू आहे.

लस विकसित करण्याच्या आणि उत्पादनाच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये देशाने ‘मिशन कोविड सुरक्षा’ अंतर्गत सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या भावनेने सतत काम केले आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले. सरकारने सर्व  लस उत्पादकांना केवळ  शक्य ती मदत व लॉजिस्टिक  सहाय्य आणि  लस मंजुरीची प्रक्रिया जलद आणि वैज्ञानिक असेल हे सुनिश्चित केले  असे पंतप्रधान म्हणाले. सद्यस्थितीत चाचणी टप्प्यात असलेल्या लसीना  शक्य ते सहकार्य व सुरळीत मान्यता प्रक्रियेची ग्वाहीही त्यांनी दिली.

पंतप्रधान म्हणाले की कोविड-19 विरूद्ध देशाच्या लढाईत आपल्या खासगी क्षेत्राच्या आरोग्यविषयक पायाभूत सुविधांनी मोठी भूमिका बजावली आहे आणि येत्या काही दिवसांत लसीकरण मोहिमेमध्ये खासगी क्षेत्र आणखी सक्रिय भूमिका बजावेल. यासाठी रुग्णालये आणि उद्योग यांच्यात अधिक चांगल्या समन्वयाची आवश्यकता असेल.

18 वर्षापेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकासाठी लसीकरण करण्यास परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयाबद्दल आणि अधिक प्रोत्साहन व लवचिकता देण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दल लस उत्पादकांनी पंतप्रधानांचे आभार मानले. लसींचा  विकास आणि उत्पादन प्रक्रियेत केंद्र  सरकारकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधानांच्या नेतृत्वाची त्यांनी प्रशंसा केली. उत्पादन वाढवण्यासाठी  योजना, आगामी नवीन लसी आणि नवीन कोरोना विषाणूवर संशोधन यावरही त्यांनी चर्चा केली.