रेड्डी यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा -भाजपा उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा आरोप

Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) | Twitter

मुंबई, 28 मार्च 2021:

दीपाली चव्हाण या महिला वन अधिकाऱ्यांच्या मृत्यूबद्दल अपर मुख्य प्रधान वन  सरंक्षक रेड्डी यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व या प्रकरणाचा तपास अमरावतीच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून काढून घेऊन अन्य निःष्पक्ष अधिकाऱ्याकडे  सोपवावा, अशी मागणी   भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

श्रीमती वाघ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की,  दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस शिवकुमार हे एकटे जबाबदार नसून दीपालीच्या तक्रारीची दखल न घेता  शिवकुमार यांना वेळोवेळी पाठिशी घालणारे रेड्डी हे सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनाही सेवेतून  निलंबित करून अटक करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीकडून वारंवार केली जात आहे. मात्र, सरकारने रेड्डी यांची बदली करून त्यांना अभयच दिले आहे.  दीपाली चव्हाण यांची या व्यवस्थेने हत्या केली आहे. आता शिवकुमार यांना वाचविण्याचे प्रयत्न पोलीस यंत्रणेकडून सुरु झाले आहेत.  शिवकुमार यांची तीन दिवसाची पोलिस कोठडी सोमवारी संपल्यावर त्यांच्या जामीनासाठी पुरेपुर प्रयत्न केले जातील. त्यामुळे  शिवकुमार सह रेड्डी यांच्यावरही 302 नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.

दीपाली चव्हाण यांनी खा.  नवनीत राणा यांच्याशी  जेव्हा संपर्क साधला होता  तेव्हा त्यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेत रेड्डी यांच्याशी संपर्क साधत शिवकुमार यांच्याबद्दलच्या दीपाली चव्हाण च्या तक्रारी सांगितल्या होत्या. खा. नवनीत राणा यांनी या संदर्भात तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांना पत्र पाठवले होते. मात्र खा. राणा यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले गेले, असेही श्रीमती वाघ यांनी नमूद केले. 

शिवकुमार आणि अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांचे मित्रत्वाचे संबंध लक्षात घेता अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांकडून हा तपास काढून घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली.