बनावट जामीन पत्राआधारे जामीन मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांसह तिघांच्या पोलीस कोठडीत वाढ

औरंगाबाद/प्रतिनिधी

बनावट  जामीन पत्राआधारे जामीन मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांसह त्यांना मदत करणाऱ्या  एक अशा तिघांच्या पोलीस कोठडीत सोमवारपर्यंत दि.22 वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रुहिना अंजूम यांनी रविवारी दि.21 दिले.

उध्दव उर्फ उद्या मजल्या भोसले (35, रा. रामगव्हाण ता. अंबड जि. जालना ह.मु. टाकळी अंबडता. पैठण), आसाब दस्तगीर शेख (22, रा. रोहतवाडी ता. पाटोदा जि. बीड) आणि विशाल मिलींद पारधे (28, रा. एन—7 सिडको, त्रिवेणीनगर औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत.

प्रकरणात हर्सुल मध्यवर्ती कारागृहाचे अधिकारी इर्शाद याकुब सय्यद (35, मुजफलनगर,एन—13) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, 1 फेब्रवारी रोजी न्यायाधीन बंदी तथा आरोपी विशाल पारधे आणि बंडू राठोड या दोघांची न्यायालयात तारीख होती. दोघांची न्यायालयात रवानगी करण्यापूर्वी कारागृहाच्या मुख्य व्दारावर त्यांची अंगझडती घेतली असता आरोपी विशाल पारधे याच्या बेल्टच्या मध्ये एक बंद पाकिट कारागृह पोलिसांना सापडले. त्यामुळे विशाल पारध याला कारागृह अधिक्षक यांच्या दालनात नेण्यात आले. तेथे उपाधिक्षक व इतर कर्मचार्यांसमोर बंद पाकीट उघडले असता, त्यात कारागृहातील बंदी तथा आरोपी आसाब शेख याचे बनावट जामीनपत्र असल्याचे समोर आले. त्यानंतर असाब शेख याच्याकडे चौकशी करण्यात आली असता त्याने सदरील बंद पाकीट विशाल पारधे याला दिल्याचे कबुल केले.

असाब शेख याचया विरोधात बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल असून त्या गुन्ह्यातील बीड सत्र न्यायालयाचे बनावट जामीनपत्र तयार करुन कारागृहातील जामीन पेटीत टाकले होते. तर आरोपी उध्दव उर्फ उद्या भोसले याच्यावर देखील मकोका अंतर्गत गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्याने देखील बीड सत्र न्यायालयाचे बनावट जामीन पत्र कारागृहातील जामीन पेटीत टाकले होते. 25 जानेवारी रोजी कारागृहातील जामीन पेटी उघडण्यात आले असता सदरील जामीन पत्रे कारागृह पोलिसांना मिळाली. मात्र पोलिसांना जामीन पत्रावर संशय आल्याने त्यांनी बीड सत्र न्यायालयाकडे पडताळणी केली असता दोन्ही जामीनपत्र बनावट असल्याचे समोर आले. प्रकरणात हर्सुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तिघा आरोपींना 17 मार्च रोजी अटक करण्यात आली तर न्यायालयाने त्यांना आजपर्यंत कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्याने आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता, सहायक सरकारी वकील बालाजी गवळी यांनी आरोपींनी बनावट जामीन पत्र कसे तयार केले याचा तपास करणे आहे. आरोपींना गुन्ह्यात आणखी कोणी सहाकार्य केले तसेच सदरील गुन्हा आरोपींनी कोणाच्या सांगण्यावरुन केला याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाकडे केली.