संत नामदेव महाराजांच्या जन्मगावी स्मारक बांधकाम कामाला गती द्या – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

संत नामदेव महाराजांच्या जन्मगावी स्मारक बांधकाम कामाला गती द्या – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

मुंबई, दि. 12 : संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या साडेसातशेव्या जयंती वर्षानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नामदेव महाराजांचे जन्मगाव असलेल्या नरसी नामदेव येथे त्यांचे स्मारक बांधण्याच्या कामाला गती देण्यात यावी, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

संत नामदेव महाराजांची 750 वी जयंती साजरी करण्यासंदर्भातील आढावा बैठक मंत्रालयात आयेाजित करण्यात आली. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात, सांस्कृतिक संचालक बिभीषण चवरे, पुरातत्व संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे आदी उपस्थित होते.

सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख म्हणाले,संत नामदेव महाराजांचे नाव महाराष्ट्राच्या संत परंपरेत अत्यंत आदराने घेतले जाते. त्यामुळे संत नामदेव महाराजांची 750 वी जयंती महाराष्ट्रात साजरी  करीत असताना त्यांचे स्मारक होणे आवश्यक असून या कामाला गती देण्यात यावी. याशिवाय वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. यामध्ये संत नामदेव महाराजांच्या चरित्रावरील नाटके, भक्ती महोत्सव, अभंगवाणी अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असेल. विशेष म्हणजे हे कार्यक्रम मुंबईसह पंढरपूर, देहू, पुणे या ठिकाणीही आयोजित करण्यात यावेत.