अँटिलिया बाँब प्रकरणात प्रदीप शर्मांना जामीन नाहीच:मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने याचिका फेटाळली

मुंबई,२३ जानेवारी/प्रतिनिधीः-अँटिलिया बाँब प्रकरण आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांची हत्या केल्या प्रकरणी अटकेत असलेले माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन देण्यास नकार दिला.

प्रदीप शर्मा यांचा जामीन अर्ज विशेष एनआयए न्यायालयाने फेब्रुवारी २०२२ मध्ये फेटाळला होता. त्याला शर्मा यांनी दिलेली आव्हान याचिका न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि आर. एन. लड्डा यांच्या खंडपीठाने फेटाळली. एनआयएचा शर्मा यांनी मनसुख हिरेन यांना संपवून टाकण्यासाठी स्वतःचाच माजी सहकारी सचिन वाझे याला मदत केली असा आरोप आहे.

फेब्रुवारी २०२१ मध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलिया निवास्थानाजवळ स्फोटकेभरलेली एसयुव्ही आढळली होती. हे वाहन हिरेन याच्या ताब्यात होते. हिरेन ५ मार्च २०२२ रोजी शेजारच्या ठाण्यात खाडीत मृतावस्थेत आढळले. शर्मा यांना या प्रकरणी जून २०२१ मध्ये अटक झाली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

माझ्याविरोधात पुरावा नाही, असा शर्मा यांचा दावा आहे तर एनआयएने हरिने यांचा थंड डोक्याने झालेल्या खूनात मुख्य कट करणारे शर्मा आहेत, असा आरोप केला आहे.

प्रदीप शर्मा हे अंबानी कुटुंबासह लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळीचे सक्रिय सदस्य होते. त्यांनी कटात कमकुवत दुवा असलेल्या मनसुख हिरेन यांना मारून टाकले, असे एनआयएचे म्हणणे आहे. हिरेन यांना संपूर्ण कटाची ( अँटिलियाबाहेर स्फोटके भरलेले वाहन उभे करणे) माहिती होती आणि ते गुप्तता राखणार नाहीत व त्यामुळे व्यापक कटाचे लाभ मिळवणे कठीण होईल अशी भीती शर्मा आणि वाझे यांना होती, असाही दावा एनआयएने केला आहे.