कोरोना ही निसर्गाची चपराकच! – कवी प्रा. मनोज बोरगावकर

दैनिक उद्याचा मराठवाडाच्या ‘पुनर्निर्माण पर्व’ चे दिमाखात प्रकाशन

नांदेड (प्रतिनिधी)- माणसानं स्वतःच्या शक्तीचा, सत्तेचा रूबाब दाखवला तर तो माज ठरतो उलट निसर्गाचं सामर्थ्य मनात ठेवलं तर ती सत्ता रूबाबदार दिसते. माणसानं निसर्गाच्या विरूद्ध आपली सत्ता चालवली. निसर्गानं अशा आपल्या शक्तीचा रूबाब दाखवणार्‍या माणसाला ही कोरोना ही मारलेली चपराक आहे असे प्रतिपादन कादंबरीकार, कवी प्रा. मनोज बोरगावकर यांनी येथे केले.

दैनिक उद्याचा मराठवाडाच्या ‘पुर्ननिर्माण पर्व’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.हॉटेल विसावा पॅलेसच्या नयनरम्य टेरेसवर झालेल्या या देखण्या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगोलीचे खा. हेमंत पाटील यांची उपस्थिती होती तर व्यासपीठावर दैनिक उद्याचा मराठवाडाचे संपादक राम शेवडीकर, ‘पुनर्निर्माण पर्व’ च्या अतिथी संपादक सौ. राजश्री हेमंत पाटील, अंकातील विशेष विभागाच्या संपादक संगीतकार आनंदी विकास, कला संपादक नयन बाराहाते आदि उपस्थित होते.

प्रा. मनोज बोरगावकर पुढे म्हणाले की, नेक दिलाने दिवाळी अंक प्रकाशित करणारे राम शेवडीकरांसारखे फार मोजके संपादक आहेत. तर नयन बाराहाते सारखी माणसं नांदेडची समृद्धी आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळातही अत्यंत निष्ठेनं दैनिक उद्याचा मराठवाडाचा दिवाळी अंक प्रकाशित केला आहे. यावर्षीच्या पुनर्निर्माण पर्वचं अंतस्थ सूत्र म्हणजे निसर्ग आहे. आपण निसर्ग वाचायला शिकलं पाहिजे. जीम कार्बेटच्या पुस्तकाचा दाखला देत प्रा. बोरगावकर म्हणाले की, जीम कार्बेटप्रमाणं प्राण्यांचं नाहरकत प्रमाणपत्र माणसानं घेतलं असतं किंवा जीम कार्बेटसारखं निसर्गाशी तादात्म्य साधणारं जीवन जगलं असतं तर कोविडचा हल्ला माणसावर झाला नसता.कोविडमध्ये माणसाचं खूप नुकसान झालं पण पुन्हा नव्याने उभं राहने गरजेचं आहे. दैनिक उद्याचा मराठवाडानं दिवाळी अंकाच्या माध्यमातून पुनर्निर्माण सुरू केलं ही खूप मोठी गोष्ट आहे असेही प्रा. बोरगावकर म्हणाले. नयन बाराहाते यांनी अत्यंत वेधक मुखपृष्ठ केल्याचे सांगून अंकाचे फीचर एडीटर आनंद शेवडीकर यांनी अत्यंत मेहनतीने आणि निष्ठेने अंकाला पूर्णत्व आणल्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत असे गौरवोद्गारही प्रा.बोरगावकर यांनी काढले.

‘पुनर्निर्माण पर्वच्या ’ अतिथी संपादक राजश्री हेमंत पाटील यावेळी व्यक्त होताना म्हणाल्या की, खरं तर एखाद्या दिवाळी अंकाचं संपादन करणं माझ्यासाठी मोठा रोमांचकारी अनुभव होता. लेखकांना संपर्क करण्यापासून अंकाच्या पूर्णतेकडे जाण्यापर्यंतच्या प्रवासातले मला आनंद शेवडीकर आणि त्यांच्या टीमने खूप मोठं सहकार्य केले. दिवाळी अंकाची निर्मिती खरं तर नवनिर्माणाची पर्वणी असते. माणसानं स्वतंःचं चिंतन करायला भाग पाडणारा हा कोरोना काळ आहे. माणसाचं जगणं थांबलं की काय? अशी भिती वाटायचा हा काळ होता. अतुल देऊळगावकर यांच्या  लेखनातून माणसानं वस्तुस्थिती बाजूला ठेवून अनिर्बंध जगणं सुरू केल्याचा हा परिणाम आहे असं  मांडलय. सर्वच लेखकांचे लेख विचारप्रवण आहेत. पुनर्निर्माण पर्वच्या निर्माणात आनंद शेवडीकरांचा सहभागच खर्‍या अर्थाने मला मोठा वाटतो. वाचक निश्चितच पुनर्निर्माण पर्वच स्वागत करतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.‘मराठीचा सांगितीक प्रवास’ या विशेष विभागाच्या संपादक संगीतकार आनंदी विकास यांनी यावेळी बोलतांना मराठी संगीतात ज्या महानुभवांनी योगदान दिले आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा या अंकात समावेश असल्याचे सांगितले. या विशेष विभागास संगीत क्षेत्रातील दिग्गजाच्या लेखांचा समावेश असून ते सर्व लेख अर्थातच वाचनीय ठेवा असल्याचे त्या म्हणाल्या.‘पुनर्निर्माण पर्व’ चे कला संपादक, प्रतिभावंत चित्रकार नयन बाराहाते यांनी अंकांचे मुखपृष्ठ आणि एकंदरच मांडणीचा आढावा घेतला.  अंकाचा आशय व्यक्त करणार्‍या मुखपृष्ठाबद्दल त्यांनी विस्तृत भाष्य केले.

उद्याचा मराठवाडा दिवाळी अंकाला राज्यात मानाचे स्थान

कार्यक्रमाचे अध्यक्ष खा. हेमंत पाटील अध्यक्षीय समारोपात म्हणाले की, कोरोनानं माणसाच्या जगण्यावरच अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. माणसानं यापुढे काय करायचं, कसं जगायचं हे शिकवले आहे. मराठी संस्कृतीत दिवाळीचा फराळ आणि दिवाळी अंक हे एक अतुट समीकरण आहे. दैनिक उद्याचा मराठवाडाच्या  अंकानं गेल्या दीड दशकात राज्यात मानाचं स्थान निर्माण केले आहे, यामागे राम शेवडीकर यांची दृष्टी आणि निष्ठा आहे असे गौरवोद्गारही खा. पाटील यांनी यावेळी काढले. आनंद शेवडीकर सारखा नवा उमदा चेहरा अत्यंत समर्थपणे समोर येत आहे ही खूप आनंदाची बाब असल्याचेही ते म्हणाले.प्रारंभी प्रास्ताविकात दैनिक उद्याचा मराठवाडाचे संपादक राम शेवडीकर यांनी अंक निर्मितीचा प्रवास सर्वाच्या सहकार्याने सुकर झाला आणि नेहमीप्रमाणे एक दर्जेदार दिवाळी अंक आम्ही वाचकांसमोर आणू शकलो असे सांगितले. कोरोनाकाळात बरंच काही वाईट घडलं असलं तरी चांगलंही खूप घडलं. या चांगल्याचा मागोवा या अंकातून घेताना एक सकारात्मक विचार शेकडो नकारात्मक विचारांना दूर करतो, जगण्याची उमेद निर्माण करतो. हाच धागा पकडून पुनर्निर्माण पर्व माणसांची मनं पुन्हा सकारात्मक विचारांनी उभी राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन पद्माकर कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमास   डॉ.सुरेश सावंत, प्रा.डॉ.केशव सखाराम, डॉ.सुजाता जोशी पाटोदेकर, देवीदास फुलारी, निर्मलकुमार सूर्यवंशी, प्रा.डॉ.दिलीप चव्हाण, वसंत मैय्या, लक्ष्मण संगेवार, प्रफुल्ल कुलकर्णी, सौ.मोहिनी शेवडीकर, सौ.श्रुती आनंद, प्रा. महेश मोरेे, प्रा. चंद्रकांत पोतदार, मधुकर कुलकर्णी, सुभाष शिराढोणकर, विकास देशमुख, उमाकांत जोशी, रवीप्रकाश कुलकर्णी, विजय होकर्णे, प्रा.डॉ.राम जाधव, किरण कुलकर्णी, प्रदीप नागापूरकर, पत्रकार विजय जोशी, शिवाजी अंबुलगेकर, अविनाशराव सराफ, सौ.स्मिता सराफ, शरद साहू, संचित सराफ, कुणाल जोशी, श्रद्धा जोशी, गोपाळ देशपांडे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते