माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेचे दाऊद गँगशी संबंध; खासदार राहुल शेवाळेंची चौकशीची मागणी

खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यांच्यावर महिलेचा छळ केल्याचा आरोप केला होता.

मुंबई ,२५ डिसेंबर / प्रतिनिधी :-शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव घेत आरोप केले होते. त्यानंतर खासदार शेवाळेंवर विरोधकांकडून महिलेचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला. यावरून आता खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार घेत आदित्य ठाकरे तसेच त्या महिलेवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, “माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. तिने मला पैशांसाठी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. त्या महिलेचे दाऊद गँगशी संबंध असून आदित्य ठाकरे हे तिला पाठीशी घालत आहे.” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “माझ्या पक्षातील काहीजण त्या महिलेला संपर्क करुन मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते. कोरोनाकाळात त्या महिलेला मी मदत केली होती. त्यानंतर त्या महिलेने मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणाची एनआयएकडून चौकशी करण्यात यावी” अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच पुढे त्यांनी आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरदेखील गंभीर आरोप केले आहेत.

ते पुढे म्हणाले की, “आरोप करणारी महिला ही दुबईची आहे. पाकिस्तानी एजंटच्या मदतीने संबंधित महिलेने फेक अकाऊंट चालवले होते. माझ्या पत्नीला वारंवार धमक्या देण्यात आल्या. ही महिला खोट्या तक्रारी करत होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी याबाबत लक्ष घालण्यास तत्कालीन मंत्री अनिल परब यांना सांगितले होते. शिवसेना सोडल्यानंतर युवा सेनेचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवली. युवा सेना प्रमुखांमुळेच या गोष्टी घडल्या.” असे गंभीर आरोप त्यांनी केले. तसेच, “ही महिला दाऊद गँगशी संबंधित आहे. संबंधित महिलेला युवा सेनाप्रमुख पाठिशी घालत आहेत. माझ्या तक्रारीनंतर सदर महिला दुबईच्या तुरूंगात गेली. संसदेत मी ‘एयू’ नाव घेतल्याने माझ्याविरोधात कट रचला आहे.” अशी टीकादेखील त्यांनी केली.