तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात ‘या’ कलाकाराला अटक; तिच्या कुटुंबाने केले गंभीर आरोप

मुंबई ,२५ डिसेंबर / प्रतिनिधी :-अभिनेत्री तुनिषा शर्माने अवघ्या २०व्या वर्षी आत्महत्या केल्यानंतर सिनेक्षेत्रात मोठी खळबळ माजली होती. हिंदी मालिका तसेच चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या तुनिषाने कमी वयात आपली वेगळीच छाप पाडली होती. तिने आत्महत्या केल्यानंतर तिचा सहकलाकार शिझान मोहम्मद खानला पोलिसांनी अटक केली आहे. तुनिषाचा सहकलाकार असलेला शिझान मोहम्मद खान आणि तिचे प्रेमसंबंध होते, पण यातून नैराश्य आल्यामुळे तिने आत्महत्या केली असल्याचे आरोप तुनिषाच्या आईने केले आहेत. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शिझान खानच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, माझ्या अशिलावर केलेल्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. सध्या त्याला २८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिझान खान आणि तुनिषा या दोघशांचेही प्रेमसंबंध होते. १५ दिवसांपूर्वीच त्यांचे ब्रेक झाले होते. यामुळे ती प्रचंड तणावात होती. यामधून आलेल्या नैराश्यामुळे तिने एवढ्या टोकाचे पाऊल उचलले. तुनिषा आणि शिझान खान हेदोघेही ‘अलीबाबा- दास्तान ए काबुल’ या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत होते. मालिकेचे चित्रीकरण सुरु असतानाच व्हॅनिटीमध्ये तिने स्वतःला गळफास लावून घेतला होता.

अशामध्ये आता तिचे मामा पवन शर्मा यांनी या प्रकरणामध्ये अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. १० दिवसांपूर्वी तुनिषा नैराश्यात गेली होती. तिची तब्येत बिघडल्याने रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते.

तुनिषाचे मामा पावन शर्मा यांनी एएनआयला सांगताना म्हणाले की, “कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून शिझान आणि तुनिषा एकमेकांच्या अतिशय जवळ होते. १० दिवसांपूर्वी तिला पॅनिक अटॅक आला होता. यामुळे तिला रुग्णालयातदेखील दाखल करण्यात आले होते. जेव्हा मी आणि तिची आई तिला भेटण्यास गेलो होतो, तेव्हा तिने तिच्यावर अन्याय झाला असून तिची फसवणूक झाल्याचे आम्हाला सांगितले. त्या दोघांमध्ये काहीतरी गडबड असल्याची आम्हाला शंका आली. जो दोषी आहे,त्याला शिक्षा व्हायलाच हवी, अशी आमची मागणी आहे.” दरम्यान, तुनिषासोबत प्रेमसंबंध असताना त्याचे बाहेरही संबंध होते. तसेच, ही गोष्ट तिला कळले होते. अशी माहिती देण्यात येत आहे.