राज्यसभा – विधानसभा निवडणुकीत पैसे घेतल्याचा आरोप खोटा -ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांच्या समाधीसमोर आ.बोरणारे यांनी केले खंडन

वैजापूर,१४ जुलै /प्रतिनिधी :- जून महिन्यात पार पडलेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूकीत मतदानासाठी आमदारांनी दोन कोटी रुपये घेतल्याच्या आरोपाचे खंडन शिंदे गटाचे आ.रमेश बोरणारे यांनी सराला बेटातील ब्रम्हलीन नारायणगिरी महाराज यांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन केले. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूकीत बंडखोर गटातील आमदारांवर राज्य पातळीपासून ते गल्लीतील पुढा-यांनी केलेल्या आर्थिक देवाणघेवाण केल्याच्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सांगितले.

पक्षप्रमुखानी दिलेल्या आदेशानुसारच आम्ही मतदान केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार बोरनारे यांनी त्यांच्यावर केलेले आरोप फेटाळून लावले.पक्ष नेतृत्वाकडून स्वपक्षातील आमदारांना दुय्यम पध्दतीच्या वागणूकी विरोधात विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठावाची भुमिका घेतली यांची पुर्व कल्पना माझ्यावर पैसे घेतल्याचा आरोप करणाऱ्या पक्षातील मित्रांना दिली होती. त्यांनी या उठावात एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहण्याचा सल्ला मला दिला होता. त्यांच मित्रांनी राजकीय स्वार्थासाठी माझ्या प्रामाणिक भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे .त्यामुळे सदगुरु नारायणगिरी महाराज यांच्या समाधीवर हात ठेवून राज्यसभा, विधानपरिषद निवडणूकीत कोणताही गैरप्रकार माझ्या हातून घडला नसल्याचा खुलासा आ.बोरनारेनी केला. 
गुरु पोणिमेच्या दिवशी केला खुलासा…. 
औरंगाबाद जिल्ह्यातून शिवसेनेतील पाच आमदारांनी पक्षा विरोधात बंड केले आहे.शिंदे गटाला समर्थन देण्यासाठी एका सहकारी आमदारांनी 50 कोटीची ऑफर देण्यात आल्याचे वक्तव्य केले होते. पक्षनिष्ठेमुळे त्यांनी तो प्रस्ताव धुडकावून लावल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला होता तो निष्फळ अर्थहीन होता.एकाच वेळी 40 आमदारांनी बंड का केले.तसेच औरंगाबाद जिल्ह्यातून एक नव्हे तर पाच आमदारांनी उठावाची भुमिका  का घेतली  यांचे आत्मचिंतन नेत्यांनी करावे असे त्यांनी स्पष्ट केले. 
कोणी केला होता आमदारावर आरोप….. 

पक्ष विरोधात बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत शिवसेना मेळावा आयोजित केला होता.या मेळाव्यात आ. रमेश बोरनारे यांनी  विधानपरिषद निवडणुकीत त्यांचे मतदान दोन कोटीत विकल्याचा आरोप करुन त्यांनी पैसे घेतले नसल्यास सराला बेटात नारायण गिरी महाराजांच्या समाधीवर हात ठेवून खंडन करण्याचे आव्हान दिले होते. 

विकासासाठी समर्थन… 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या अडीच  वर्षांच्या राजवटीत रोटेगाव एम.आय.डी.सी साठी शेतक-यांची संपादित केलेल्या भूसंपादनावर प्रकल्पग्रस्त शेतक-यांनी वाढीव मोबदला देण्यासाठी केलेली मागणीची पुर्तता करुन तीस वर्षापासून प्रलंबित पडलेला औद्योगिक वसाहत कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्नशील आहे.श्री.रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेतील पंधरा गावातील शेतक-यांच्या सातबा-यावर जिल्हा बँकेच्या कर्जाची नोंद आहे.त्या शेतक-यांना कर्ज माफी योजनेचा लाभ देऊन जलसिंचन योजना कार्यान्वित करणे, गोदावरी नदीपात्रातील शनिदेवगाव येथे नवीन उच्च पातळीचा बंधारा बांधणे, ऊस उत्पादक शेतक-यांची परवड थांबवण्यासाठी खाजगी तत्वावर साखर कारखाना कुठल्याही परिस्थितीत सुरु करण्यात येईल.मतदार संघातील प्रत्येक गावाला डांबरी रस्त्याने जोडण्याची कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.