शिवराईत वाटमारी; १८ हजाराचा ऐवज पळवला

वैजापूर,३१ मार्च /प्रतिनिधी :- नागपूर- मुंबई महामार्गावर शिवराई शिवारात दुचाकीवर आलेल्या दोघांनी अन्य दुचाकीवरील एकाच्या खिशातील मोबाईल व मणी मंगळसुत्र असा अठरा हजार रुपये किंमतीचा ऐवज पळवला. ही घटना बुधवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 

कोरडगाव (ता. वैजापूर) येथील मनोज पवार हे आपली आई लताबाई यांना घेऊन नातेवाईकांकडे वर्षश्राद्धासाठी पालखेडला गेले होते. तेथुन बॅकेच्या कामासाठी वैजापूर येथे येत असतांना दहेगावच्या पुढे शिवराई शिवारात गणपती मंदिराच्या जवळ आल्यावर तोंडावर रुमाल बांधलेल्या 25 ते 30 वयोगटातील दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांची दुचाकी थांबवली त्यातील एकाने पवार यांच्या खिशातील मोबाईल हिसकावुन घेतला व नंतर लताबाई यांच्या गळ्यातील मणी मंगळसुत्र बळजबरीने हिसकावले असता लताबाई यांनी लगेच मंगळसुत्र पकडले. त्यामुळे दोन ग्रॅम वजनाचे 33 सोन्याचे मणी, एक ग्रॅम वजनाच्या दोन पळ्या व चार सोन्याचे मणी असे अर्धे मंगळसुत्र चोरट्यांच्या हातात गेले. मोबाईल व मणी मंगळसुत्र घेऊन त्यांनी पोबारा केला. याप्रकरणी मनोज पवार यांच्या फिर्यादीवरुन दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विकास ढोकरे करीत आहेत.