कोरोनाचे संकट : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे रुग्णालयातून जनतेला भावनिक पत्र

मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी रुग्णालयातून जनतेला पत्र लिहून आवाहन केले आहे. टोपे यांना कोरोनाची बाधा झाल्याने ते सध्या उपचार घेत आहेत. मात्र, असे असताना वाढता कोरोनाचा धोका लक्षात घेऊन त्यांनी रुग्णालयातूनच पत्र लिहिले आहे. त्यांनी हे पत्र ट्विट केले आहे.

राजेश टोपे यांनी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली आहे. टोपे यांनी जनतेला उद्देशून पत्र लिहिले असून कळकळीचे आवाहन केले आहे. गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना विरुद्धची लढाई लढत आहोत. सरकारची खंबीर भूमिका, ठोस उपाययोजना आणि प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक कोरोना योध्ये विशेषतः डॉक्टर, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलीस, स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण कोरोना नियंत्रित करु शकलो, असे पत्रात राजेश टोपे यांनी कोरोना योध्यांचे कौतुक केले आहे.