काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले, सहा नवे कार्याध्यक्ष

नवी दिल्ली,
महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे नाना पटोले यांच्या हाती आता महाराष्ट्र काँग्रेसची सूत्र असणार आहेत. पटोले यांच्यासह 6 नवे कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात आले आहे. यात प्रणिती शिंदे, चंद्रकांत हांडोरे, बसवराज पाटील, नसीम खान, शिवाजीराव मोघे, कुणाल रोहिदास पाटील यांच्या नावांचा समावेश आहे.

बाळासाहेब थोरात यांनी प्रदेश अध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रदेश अध्यक्षपद कोणाला मिळार याचीच जोरदार चर्चा सुरु झाली आहे. नव्या नेतृत्वाची चाचपणी करण्यासाठी दिल्लीतून काँग्रेसने राज्यात प्रतिनिधीही पाठवले होते. यात अनेक नावे स्पर्धेत होती. मात्र, नाना पटोले यांच्यावर विश्वास काँग्रेसने दाखवला आहे.नाना पटोले यांच्या हाती आता महाराष्ट्र काँग्रेसची सूत्र असणार आहेत. तसेच 10 उपाध्यक्षांचीही नियुक्ती केली आहे. यात शिरीष मधुकरराव चौधरी, रमेश बागवे, हुसेन दलवाई, मोहन जोशी, रणजित कांबळे, कैलास गोरंट्याल, बी. जी. नगराळे, शरद आहेर, एम. एम शेख, माणिक जगताप यांचा समावेश आहे.

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचे नाव प्रदेशाध्यपदासाठी निश्चित होते. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे स्पष्ट झाले होते. आज त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले आहे. त्यामुळे सरकारमध्ये काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देणे अपेक्षित असल्याचे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटले आहे. सरकार स्थापन करताना विधानसभा सभापतीपद काँग्रेसला मिळाले. मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपद दिले जावे, यावर त्यावेळी निश्चिती झाली होती. त्यामुळे आता पक्षीय समतोल राखण्यासाठी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद दिले जावे. तसेच शिवसेनाही विधानसभा सभापतीपदावर दावा करू शकते. त्यामुळे या मुद्द्यांवर तिन्ही पक्षाच्या प्रमुखांची चर्चा होऊन एकमताने निर्णय घेतला जाईल, असेही माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.