न्यायालयीन कामकाज सोमवार पासून दोन सत्रात

नांदेड, दि. 5 :- जिल्हा न्यायीक विभागातील निम्या न्यायालयांचे मर्यादित कामकाज सोमवार 8 जून 2020 पासून सकाळी 10.30 ते 1.30 वाजेपर्यंत व निम्या न्यायालयात दुपारी 2.30 ते 5.30 यावेळेत दोन सत्रात सुरु होणार आहे. कोवीड-19 या संसर्गजन्य साथ रोगाच्या पार्श्वभुमीवर उच्च न्यायालयाने न्यायालयीन कामकाजाबाबत व न्यायालयात प्रवेशाबाबत विहित केलेले निर्देश विचारात घेऊन नांदेड येथील न्यायालय संकुलात प्रवेश व न्यायालयीन कामकाजाबाबत प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक अ. धोळकिया यांनी निर्देश दिले आहेत.

या निर्देशानुसार नांदेड जिल्हा व सत्र न्यायालय, मुख्य न्यायदंडाधिकारी नांदेड व दिवाणी न्यायालय वरीष्ठ स्तर नांदेड यांच्याकडे दाखल होणारी सर्व प्रकरणे (दोषारोपपत्र वगळून) कामकाजाच्या दिवशी फक्त सकाळी 10.30 ते 1.30 यावेळात निर्देशीत केलेल्या कक्षामध्ये दाखल करुन घेण्यात येतील. तसेच एक वकील एकावेळी दहापेक्षा जास्त प्रकरणे दाखल करु शकणार नाही. जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात येणाऱ्या प्रकरणातील शपथपत्रांची पडताळणी कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 यावेळात निर्देशीत केलेल्या कक्षामध्ये केली जाईल. संबंधीत वकीलांनी आपआपली प्रकरणे निर्दिष्ट जागी उपलब्ध करुन दिलेल्या बॉक्समध्ये टाकावीत. कोणत्याही वकीलास कामकाजावेळी न्यायालयातील संचिका प्रत्यक्ष हाताळता येणार नाही. सर्व वकीलांनी शक्यतोवर आपआपल्या प्रकरणातील युक्तीवाद लेखी स्वरुपात सादर करावा.

न्यायालयातील प्रवेश व संचाराबाबतचे निर्देश, न्यायालयातील दैनिक बोर्डवर असणाऱ्या व पक्षकाराच्या अनुपस्थितीत घेता येणाऱ्या फक्त युक्तीवाद व अंतरिम युक्तीवाद असलेल्या प्रकरणात वकिलांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या समोरच्या कार्यालयामधून न्यायालयातील प्रवेशाबाबतचे प्रवेशपत्र / पास अदा केल्या जातील. ज्या वकिलांकडे प्रवेशपत्र आहे, त्यानांच न्यायालयाच्या मुख्य इमारतीत प्रवेश दिला जाईल. जेष्ठ वकिलांच्या सोबत त्यांच्या सहकारी कनिष्ठ वकीलास न्यायालयाच्या मुख्य इमारतीत प्रवेश दिला जाणार नाही. कोणत्याही पक्षकारास न्यायालयात प्रवेश दिला जाणार नाही.

न्यायालय परिसरात प्रवेश करतांना सर्वाची थर्मल तापमापक संयंत्राद्वारे तपासणी केली जाईल. 38 अंश से. पेक्षा अधीक तापमान असलेल्या किंवा सर्दी, पडसे इत्यादी कोवीड-19 ची अन्य लक्षणे असलेल्या किंवा घोषित केलेल्या प्रतिबंधक क्षेत्रातून आलेल्या व्यक्तीस न्यायालयात किंवा न्यायालयाच्या परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

अभिवक्ता संघाची सर्व दालने बंद ठेवण्यात येतील याची नोंद घ्यावी. सर्व विधीज्ञ आणि पक्षकारांनी केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी कोवीड-19 पासून बचाव करण्याच्या संदर्भात दिलेल्या सुचनांचे व उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करुन न्यायालयातील कामकाज सुरळीतपणे पार पाडण्याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश दिपक धोळकिया यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *