साहित्य वर्तुळातील नामवंतांचा पुरस्कार नागपूरसाठी भूषणावह – पालकमंत्री डॉ.नितीन राऊत

महेश एलकुंचवार, श्याम पेठकर, अरुणा सबाने यांचा सत्कार

नागपूर, दि. २६ : साहित्य, कला,सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय चळवळीचे केंद्र असणाऱ्या नागपूर शहरातील तीन नामवंतांना साहित्य व सामाजिक क्षेत्रातील मिळालेले पुरस्कार विदर्भासाठी भूषणावह आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज येथे केले.

अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी बांधवांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाऊंडेशनचे तीन मानाचे पुरस्कार यावर्षी प्रसिद्ध नाटककार, साहित्यिक महेश एलकुंचवार, ज्येष्ठ पत्रकार, लेखक श्याम पेठकर, सामाजिक कार्यकर्ता, प्रकाशक अरुणा सबाने या नागपुरातील तीन नामवंतांना मिळाले आहेत. या तीनही ज्येष्ठांपर्यंत पोहोचून आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला.

या सत्काराच्या वेळी भावना व्यक्त करताना ते म्हणाले, समाजकार्य, सांस्कृतिक महोत्सव, साहित्यनिर्मिती, कला, क्रीडा क्षेत्रात नागपूरचे नाव पर्यायाने विदर्भाचे नाव कायम अग्रेसर असणे एक नागपूरकर या नात्याने अभिमानास्पद आहे. महाराष्ट्र फाऊंडेशनने कोणताही अर्ज न घेता हे पुरस्कार प्रदान केले हे उल्लेखनीय आहे. कला व सामाजिक क्षेत्रातील नामवंत आपापल्या क्षेत्रात फकिरी वृत्तीने वावरत असतात, त्यांची त्यांच्या नकळत स्वतः दखल घेऊन सन्मान करणे प्रेरणादायी आहे. त्यामुळेच प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना सन्मानित करण्याचे नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या निवासस्थानी भेट देऊन पालकमंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला. तर ज्येष्ठ पत्रकार, नाटक -चित्रपट पटकथाकार श्याम पेठकर, सामाजिक कार्यकर्ता अरुणा सबाणे यांचा भरतनगर वनराई कार्यालयात सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र फाऊंडेशन तर्फे श्री.महेश एलकुंचवार यांना यावर्षीचा दिलीप वि. चित्रे स्मृति साहित्य जीवनगौरव सन्मान मिळाला आहे. तर विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एकल महिलांवर आधारित तेरवं या नाट्यसंहितेसाठी रा. श. दातार नाटय पुरस्कार श्याम पेठकर यांना मिळाला आहे. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या अरूणा सबाने यांना कार्यकर्ता (प्रबोधन ) पुरस्कार मिळाला आहे.

या कृतज्ञता सत्कार सोहळ्याला पालकमंत्र्यांसोबत, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब देशमुख, निलेश खांडेकर, प्राध्यापक जवाहर चरडे, वंदना वनकर आदी उपस्थित होते.