एनसीसी संचलनात मुलींनी केलेले नेतृत्व महिला सक्षमीकरणाची नांदी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

प्रजासत्ताक दिन शिबिरात महाराष्ट्राची विजयी पताका फडकावणाऱ्या एनसीसी चमूचे राज्यपालांकडून अभिनंदन

मुंबई, दि. 2 : नवी दिल्ली येथे झालेल्या प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये महाराष्ट्राचा ध्वज फडकावत तब्बल सात वर्षांनी पंतप्रधानांचे ध्वजनिशाण तसेच सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान प्राप्त करणाऱ्या एनसीसीच्या महाराष्ट्र चमूचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे बोलावून अभिनंदन केले.

आज महिला युद्धविमाने चालवीत आहेत. यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये महाराष्ट्र एनसीसीच्या ग्रुप कॅप्टन मुलींनी संचलनात तसेच विविध स्पर्धांमध्ये नेतृत्व प्रदान केले. देशात महिला सशक्तीकरणाचा सूर्योदय होत असल्याची ही नांदी आहे, असे राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.

दिल्ली येथून विजयध्वज घेऊन परतणाऱ्या महाराष्ट्र एनसीसीच्या ५७ कॅडेट्स व अधिकाऱ्यांसाठी राज्यपालांनी राजभवन येथे चहापानाचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्राचे नाव उंचावते तेंव्हा राज्यपाल या नात्याने आपली मान देखील उंचावते. एनसीसीचे छात्र हे देशाचे उद्याचे नेते असून प्रत्येकामध्ये अपार शक्ती आहे. एनसीसीमध्ये आत्मसात केलेली शिस्त व राष्ट्रनिष्ठा कायम ठेवल्यास युवक सर्व क्षेत्रात प्रगती करतील, असे राज्यपालांनी कॅडेट्सना सांगितले.

राज्यपालांनी यावेळी चमूने पटकावलेली पदके तसेच चषक पाहिले.

यावेळी महाराष्ट्र एनसीसीच्या महानिदेशक वाय पी खंडुरी यांनी एनसीसी महाराष्ट्राच्या विजयाची यशोगाथा सांगितली.