डॉक्टरला 13 लाख रुपयांना गंडा,आरोपीच्या पोलीस कोठडीत वाढ

औरंगाबाद, दिनांक १३  :  
आयुर्वेदिक औषध एका डिलर्सकडुन खरेदीकरुन ती लंडन येथील कंपनीला उच्च दरात विक्री करण्याचे आमिष दाखवून डॉक्टरला तब्बल 13 लाख 90 हजार रुपयांना गंडा घातल्याप्रकरणात पालघर येथुन अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या पोलीस कोठडीत गुरुवारपर्यंत दि.17 वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एस. मांजरेकर यांनी रविवारी दि.13 दिले. चेतन पांडुरंग तोरस्कर (25, रा. खार्डी, दातीवरे ता.जि. पालघर) असे आरोपीचे नाव आहे.
प्रकरणात डॉ. शेख अखतर (61) यांनी फिर्याद दिली. डॉ. शेख यांचे मध्यवर्ती बस स्थानकासमोर नवजीवन आयुर्वेदिक डिस्पेन्सरी आहे. दरम्यान त्यांची फेसबुकवर नॅन्सी डॅनिअल, डॉ. मार्टीन फोर्ड, अँडी फ्रीमॅन याच्यांशी ओळख झाली. त्यांनी आपण लंडन येथील एका मोठ्या कंपनीत असल्याची थाप मारली. व शेख यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला त्यामध्ये पुजा डिलर्सकडून आयुर्वेदिक औषधी खरेदी करुन ती माझ्या लंडन येथील कंपनीला उच्च दरात विक्री करु. व मिळालेला नफा दोघांमध्ये समान वाटून घेवु अशी थाप मारली. या आमिषाला डॉ. शेख बळी पडले. त्यांनी पुजा डिलर्सकडून 13 लाख 90 हजारांची औषधीचे पार्सल सदरील कंपनीच्या पत्यावर पाठविली. मात्र पार्सलवर चुकीचा मोबाइल क्रमांक टाकल्याने पार्सल उशीरा मिळाले. त्यामुळे त्यांनी ऑर्डर रिजेक्ट केली. त्यानंतर डॉ. शेख यांनी पैशांची मागणी केली असता त्यांनी नकार दिला. त्यामुळे त्यांनी पुजा डिलर्सची संपर्क साधला असता त्यांनी देखील औषधी परत घेणार नाही, आणि पैसेही परत देणार नाही असे सांगितले. प्रकरणात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी तपास करुन आरोपी  चेतन तोरस्कर याला 10 डिसेंबर रोजी अटक केली. त्याची चौकशी केली असता, विक्‍की शिरोडकर (रा. विरार, पालघर) याच्या साथीने बालाजी इंटरप्रायजेस नावाने एसबीआय व आयसीआयसीआय बँकेत बनावट अकाउंट  उघडले. विक्‍की शिरोडकर हा लोकांची फसवणुक करुन पैसे जमा करायचा. पैसे कमी असल्यास शिरोडकर हा एटीएमव्दारे काढायचा. आणि पैसे जास्त असल्यास तोरस्कर हा चेकव्दारे काढायचा व त्यातून आपले कमीशन घेवुन उर्वरित पैसे शिरोडकरला देत असल्याची कबुली दिली.
दरम्यान आरोपीच्या कोठडीची मुदत संपल्याने त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपीच्या कोठडीत 17 डिसेंबरपर्यंत वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील ए.व्ही. घुगे यांनी काम पाहिले.