मराठवाड्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासु दिली जाणार नाही-सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

जालना दि. 27 :- बदनापुर तालुक्यातील देवगाव–कुसळी, चिखली-बदनापुर–नानेगाव ढोकसाल दरेगाव या क्षतीग्रस्त रस्त्यांची राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज दि. 27 ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष भेट देत पहाणी करुन मराठवाड्यासाठी निधीची कमतरता भासु दिली जाणार नसल्याचे सांगत जालना जिल्ह्यासाठीही अधिकचा निधी देण्यात येणार असल्याचे सांगितले.

आमदार नारायण कुचे, माजी आमदार सुरेश जेथलिया, संतोष सांबरे, संजय लाखे-पाटील, राजाभाऊ देशमुख, भीमराव डोंगरे, विलास औताडे, लक्ष्मण म्हसेकर, शेख अन्वर, सुभाष मगरे, परमेश्वर गोते, तहसिलदार श्रीमती छाया पवार, कार्यकारी अभियंता श्री चांडक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे आदींची उपस्थिती होती.

कुसळी येथे गावकऱ्यांशी संवाद साधताना मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, मराठवाड्याच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्नशिल असुन मुख्यमंत्र्यांनी राज्यासाठी दहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. या पॅकेजमधुन सार्वजनिक बांधकाम विभागासाठी 2600 कोटी देण्यात येणार असुन यातुन मराठवाडा विभागासाठी साडेपाचशे कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. देवगाव-कुसळी-मालेगाव रस्त्याच्या कामासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजुर असुन हा रस्ता साडेपाच मीटर करण्याची गावकऱ्यांची मागणी आहे. गावकऱ्यांची मागणी लक्षात घेता हा रस्ता साडेपाच मीटर करण्याबरोबरच या या रस्त्यावर चार ठिकाणी पुलांच्या उभारणीसाठी अधिकचे नऊ कोटी असे एकुण साडेबारा कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात येत असुन या रस्त्याचे काम गुणवत्तापुर्ण व दर्जेदार करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.