संजय राऊत यांच्या धमकीमुळे शिवसेनेचे आमदार पळून गेले?

नवी दिल्ली :-निवडणूक आयोगापुढे ठाकरे विरूद्ध शिंदे गट आणि शिवसेना कुणाची हा वाद सुरू आहे. अशात आज (सोमवारी) लेखी युक्तिवाद दोन्ही गटांनी निवडणूक आयोगात दावा दाखल केला आहे. या सगळ्यात लेखी युक्तिवादात संजय राऊत यांच्याविरोधात शिंदे गटाने मोठा आरोप केला आहे. निवडणूक आयोगात आता पुढे काय होणार? पक्ष आणि चिन्ह कुणाला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र शिंदे गटाने हा दावा केला आहे की संजय राऊत यांच्या धमकीमुळे आमदार पळून गेले. याबाबत संजय राऊत मंगळवारी काही बोलणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

काय म्हटलं आहे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाने?

शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा? हा वाद निवडणूक आयोगासमोर सुरु आहे. निवडणूक आयोगासमोर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत दोन्ही गटांना लेखी म्हणणं निवडणूक आयोगासमोर सादर करायचं होतं. त्यानुसार दोन्ही गटांनी आपलं म्हणणं मांडलं आहे. यामध्ये शिंदे गटाने मांडलेल्या लेखी भूमिकेत ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी धमक्या दिल्यामुळे आमदार पळून गेले असं शिंदे गटाने युक्तिवादात म्हटलं आहे. त्यामुळे आता संजय राऊत यावर काही उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सुप्रीम कोर्टाने सुरक्षा पुरवण्याचा आदेश दिल्याचा उल्लेख

शिंदे गटाच्या युक्तिवादात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा उल्लेख करण्यात आला आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटाच्या आमदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना धोका निर्माण झाला . त्यानंतर राऊत यांच्या धमकीची दखल घेऊन सुप्रीम कोर्टाने सुरक्षा पुरवण्यास सांगितलं होतं असाही उल्लेख लेखी युक्तिवादात करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदेंचं मुख्य नेतेपद घटनाबाह्य असल्याचा ठाकरे गटाचा दावा

शिवसेना ठाकरे गटाने आज निवडणूक आयोगाला सादर केलेल्या लेखी युक्तिवादात एकनाथ शिंदे यांच्या बंडांची माहिती देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाला २० जून २०२२ पासूनच्या घटनाक्रमांची माहिती देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेले मुख्य नेतेपद हे शिवसेनेच्या घटनाविरोधी असल्याचा युक्तिवाद ठाकरे गटाने केला आहे. शिंदे गटाने पक्षावर आणि पक्ष चिन्हावर केलेला दावा हा चुकीचा असल्याचेही ठाकरे गटाने म्हटलं आहे तसंच पक्ष हा आमदार खासदारांचा नसतो असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे. याबाबत अरविंद सावंत असं म्हणाले की शिवसेना पक्षप्रमुख यांच्यावर विश्वास ठेवून आमदार आणि खासदारांना मतं मिळाली आङेत. विधानसभेत एक संख्याबळ असलेल्या आमदाराने पक्षांतर केलं तर त्याच्यासोबत पक्ष गेला असं म्हणणार का? असाही प्रश्न सावंत यांनी विचारला आहे.

आम्ही बंड केलेलं नाही, उठाव केला आहे

आम्ही बंड केलेलं नाही, तर आम्ही उठावच केला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचाच उठाव केला आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि आमदारांच्या मनात ही भावना होती. ज्यांच्या आशीर्वादामुळे आम्ही निवडून आलो त्यावरून आम्ही हा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटाने काय म्हटलं आहे ते त्यांना वाटत असेल ते म्हणत आहेत अशी भूमिका राहुल शेवाळे यांनी घेतली आहे. कुठलाही उठाव हा एका दिवसात, एका रात्रीत होत नाही. मतदारांनी जो कौल दिला त्याविरोधात आघाडी करण्यात आली होती. तसंच विविध घटना पुढे घडल्या त्यामुळे आम्ही उठाव केला असंही राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे.