प्रकाशयात्री डॉ. मुरहरी केळे यांची प्रेरणादायी व संघर्षशील जीवनगाथा – ‘एडका’

मराठी साहित्य विश्वात आणि देशाच्या विद्युत क्षेत्रात आपल्या महाकर्तृत्ववान योगदानाने ठळक होत गेलेले अवलिया अभियंत्याचे नाव म्हणून प्रकाशयात्री डॉ. मुरहरी केळे यांच्याकडे पाहावे लागते. मराठवाड्यातील पूर्वीच्या उस्मानाबाद व आत्ताच्या धाराशिव या जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील ‘केळेवाडी’ या छोट्याशा खेडेगावात दिनांक १० मार्च, १९६६ रोजी जन्म घेऊन अत्यंत गरिबी व प्रतिकूल परिस्थितीत डॉ.मुरहरी केळे यांनी जिद्दीने  शिक्षण घेतले. वडील ह.भ.प.सोपानकाका केळे व मातोश्री सोनाबाई केळे यांच्या सुसंस्कारात वाढलेल्या डॉ.मुरहरी केळे यांनी जिद्द, चिकाटी, अभ्यास व संघर्षाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीला शरण आणले. वडील कै. ह.भ.प .सोपानकाका अशिक्षित असूनही अध्यात्मिक गुरूंच्या कृपेने लिहायला व वाचायला शिकले. येडशीच्या रेल्वे स्टेशनवर हमाली करत रामकृष्णबाबांना गुरू करून अध्यात्मिक मार्गाला लागले. शेतमजूर म्हणून त्यांनी अहोरात्र कष्ट केले. रोजगार हमीची कामे, रस्ते, तळी व विहिरींची प्रचंड कामे करून त्यांनी सचोटीने चरितार्थ चालविला. त्यांना २ मुले आणि ४ मुली झाल्या. अत्यंत गरिबीत त्यांनी संसार केला. गरीबीतही मुलांना सुसंस्कार आणि कठोर परिश्रमाचे धडे  त्यांनी दिले. केळेवाडी, कन्हेरी, वाशी, बार्शी, उस्मानाबाद, औरंगाबाद येथे दारिद्र्याशी दोन हात करत डॉ. मुरहरी केळे यांचे प्राथमिक ते महाविद्यालयीन व पदव्युत्तर पदवी पर्यंतचे शिक्षण झाले. बार्शी येथे इयत्ता १२ वी सायन्स पर्यंत त्यांचे शिक्षण झाले. पुढे औरंगाबाद येथे त्यांचे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण अत्यंत संघर्षातून पार पडले. सन १९८९ मध्ये ते पदवीधर झाले आणि प्रारंभीच मेसर्स गरवारे  प्लास्टिक्स अँड पॉलिस्टर कंपनी, औरंगाबाद येथे त्यांनी आपल्या सेवेला १९८९ साली सुरुवात केली.

            सन १९९१ साली डॉ. मुरहरी केळे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात सेवेत लागले. त्यांनी चिपळूण, भिवंडी, मुंबई, पेण, नागपूर, इंदूर, अकोला, त्रिपुरा अशा ठिकाणी त्यांनी अनेक पदावर विद्युत अभियंता म्हणून उत्कृष्ट सेवा केली. या सेवेत असतांना त्यांनी आपल्या उच्च कर्तृत्वाची, नेतृत्वाची आणि कुशल प्रशासकाची नवी ओळख निर्माण केली. उच्च पदस्थ अधिकारी असूनही ते नेहमीच जगण्या-वागण्यात साधे राहिले. सर्वसामान्यांत  मनापासून मिसळत राहिले. अधिकाराने माणसे वाकवता येतात, पण जिंकता येतीलच याची शाश्वती देता येत नाही. परंतु डॉ.मुरहरी केळे यांनी अधिकार वापरून माणसे न वाकवताही जिंकली आणि प्रेमाने कायमची जोडूनही ठेवली. चुंबकीय व्यक्तिमत्त्वामुळे त्यांच्याशी जोडली गेलेली माणसे, त्यांनी कायमची जिव्हाळा आणि आपुलकीने जपून ठेवली आहेत. आजही त्यांचा मित्र परिवार खूप मोठा आहे.

           प्रतिकूल परिस्थितीवर मात करताना शिक्षणाशिवाय पर्याय नाही, हे डॉ.केळे साहेबांनी ओळखले होते. त्यांचे आई- वडील अशिक्षित होते. त्यांचे ढोर कष्ट डॉ.केळे साहेबांनी जवळून पाहिले होते. या गरिबीवर मात करण्यासाठी डॉ.केळे यांनी  परिस्थितीशी झुंज देत शिक्षणाची संगत कायम ठेवली. म्हणून विविध विद्याशाखांतील ज्ञान घेण्यासाठी आयुष्यभर त्यांनी शिक्षण घेतले. आज सेवानिवृत्ती जवळ आली तरीही त्यांचे शिक्षण चालूच आहे. बी. ई. (इलेक्ट्रिकल), एम.बी.ए. ( मार्केटिंग), एलएल. बी., डी. आय.टी., बी. जे. (बॅचलर ऑफ जर्नालिझम),  ए. सी. पी. डी. एम., एनर्जी ऑडिटर, पीएच.डी., एम.ए. (मराठी) या पदव्या घेऊनही न थांबता सद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथे ‘निवडक मराठी साहित्यातील विजेचे चित्रण’  या विषयावर त्यांची दुसरी पीएच.डी. चालू आहे. बहु विद्याशाखीय ज्ञान असणारा महाविद्वान म्हणून डॉ.केळे यांनी जागतिक पातळीवर आपली वेगळी छाप उमटविली आहे.

         लहानपणी डॉ. केळे साहेबांच्या केळेवाडी या गावात लाईट नव्हती. त्यांनी रॉकेलच्या चिमणीवर आणि कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास केला. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात नोकरी करत आपल्या कर्तृत्वाने स्वतःच्या जीवनात व लोकांच्या घरा-घरात विजेचा प्रकाश देण्यात डॉ. मुरहरी केळे यांनी आपली हयात घालविली. अंधाराशी लढा देत ते कायमचे प्रकाशयात्री झाले.

       डॉ. केळे साहेबांच्या प्रचंड विद्वत्तेचे तेज त्यांच्या अनेक ग्रंथांतून पडलेले दिसते. त्यांच्यातला दमदार अधिकारी व कसदार लेखक त्यांच्या ग्रंथांतून  पानोपानी  दिसतो. ‘पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर स्मरणिका (१९९५), ‘संतवाणी’ (१९९७) आणि मी एम एस (२०१६) या तीन मराठी पुस्तकाचे संपादन,  ‘जगी ऐसा बाप व्हावा’(२०११) हे वडिलांचे चरित्र, ‘शब्दशिल्प’ ( २०१२) हा ललित लेख संग्रहाचे पुस्तक, आणि ‘नानी’ (२०१६) हे आई वरील चरित्रात्मक कादंबरी त्यांनी लिहिली. आई-वडिलांची स्वतंत्र चरित्रे लिहून स्वतःचे आत्मचरित्र लिहिणारे डॉ. केळे हे मराठी विश्वातील एकमेव लेखक असावेत. वडील ह.भ.प. सोपानकाका केळे यांचे जीवन कर्तृत्व जगाला सांगण्यासाठी लिहिलेल्या ‘जगी असा बाप व्हावा’ या अप्रतिम चरित्रग्रंथाची इंग्रजी व हिंदी भाषांमध्ये भाषांतरे झाली असून ‘The Incredible Father’ या नावाने इंग्रजीत डॉ.ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांनी तर ‘जग में ऐसा हो पिता’ या नावाने हिंदी भाषेत डॉ.ना.ग.काळे (इंदौर ) यांनी अनुवाद केला आहे. तसेच ‘जगी ऐसा बाप व्हावा’ या चरित्र ग्रंथावर सुप्रसिद्ध साहित्यिक आणि समीक्षक प्रा. डॉ. महेश खरात यांनी ‘जगी ऐसा बाप व्हावा : संदर्भ आणि समीक्षा’  या नावाने मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत भाषेतील अभ्यासकांच्या लेखांचे उत्तम संपादन २०१४ मध्ये प्रकाशित केले आहे. वाचक या ग्रंथावर भरभरून प्रेम  करताना दिसत आहेत.

        मराठी ललित साहित्याबरोबरच डॉ. केळे यांनी त्यांच्या व्यावसायिक विद्युत क्षेत्रातील दोन इंग्रजी ग्रंथांचेही लेखन केले असून त्यांचे ‘Power Distribution Franchisee – A Success Story Of First Franchisee Model In Electricity Distribution Sector In Bhiwandi’(२०१४) आणि ‘Distribution Franchisee Business : A Case Study Of Nagpur’ (२०१५) हे दोन इंग्रजी ग्रंथ भारत सरकारच्या केंद्रीय उर्जा मंत्रालयानी प्रसिद्ध केले आहेत.  श्री. केळे यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांतून शोधनिबंध सादर करून प्रकाशित केले आहेत. अनेक नियतकालिकांतून ललित आणि संशोधनपर लेखांचे लेखन केले आहे. वीज क्षेत्राशी संबंधित अनेक संस्था व सामाजिक संस्थांवर पदाधिकारी म्हणून कार्य करून योगदान दिले आहे. डॉ. केळे यांच्या साहित्य व व्यावसायिक कार्याची दखल घेऊन, त्यांना ३५ पेक्षा अधिक  पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अनेक वेळा त्यांनी सहभाग घेऊन योगदान दिले आहे. दिनांक १८, १९ व २० जानेवारी, २०१९ रोजी म्हसवड (जि. सातारा ) येथे भरलेल्या तिसऱ्या आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे सन्माननीय अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले आहे. त्यांचे ४० पानी छापील अध्यक्षीय भाषणाचे पुस्तक फारच अभ्यासपूर्ण  व अप्रतिम झाले आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ या मराठी चित्रपटाचे कथालेखन करून, संशोधन विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. त्यांनी ‘मला आई पाहिजे’(२०१४) या मराठी चित्रपटात अभिनेता म्हणून ‘रहिमचाचा’  ही भूमिका सुंदरपणे साकार केली आहे.

           डॉ. मुरहरी केळे यांनी जगातल्या अनेक देशांमध्ये अभ्यास दौरे करत प्रवास केला आहे. दुबई, फ्रान्स, जर्मनी, इटली, अमेरिका, जपान, इंग्लंड, स्वित्झर्लंड, नेदरलंड, थायलंड, स्पेन, बांग्लादेश, इत्यादी अनेक देशांमध्ये त्यांनी संस्मरणीय प्रवास भेटी दिल्या आहेत.

          डॉ. मुरहरी केळे यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात मुख्य अभियंता (वाणिज्य). संचालक (वाणिज्य), मध्य प्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनी इंदोरचे संचालक (तांत्रिक), त्रिपुरा राज्य विद्युत मंडळाचे ‘अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक’ या सर्वोच्च पदावर त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे.  ‘केळेवाडी ते अमेरिकेच्या व्हाईट हाऊस’ पर्यंतचा  त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.

         ‘एडका’ हे डॉ.मुरहरी केळे यांचे संघर्षशील व प्रेरणादायी आत्मचरित्र सोलापूरच्या अन्वी पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे. त्यात ‘कोकरू’, ‘बालिंगा’, ’एडका’ व ‘एडक्याच्या धडका’ या चार भागात हे आत्मचरित्र विभागले गेले आहे. ‘कोकरू’ या विभागात जन्म ते बालपणचा प्रवास आला आहे. ’बालिंगा’ या विभागात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेताना स्वतःचा व आई-वडिलांचा संघर्ष चित्रित केला आहे.  ‘एडका’  या विभागात महाविद्यालयीन तरुण वयात शिक्षण घेतानाचा. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळात लागलेल्या नोकरीचा,   लग्न, कौटुंबिक व प्रापंचिक जीवनाचे चित्रण आले आहे. तर ‘एडक्याच्या धडका’ या चौथ्या विभागात महाराष्ट्र राज्य विद्युत  मंडळात काम करताना पार पाडलेल्या जबाबदाऱ्या व त्यांनी केलेला संघर्ष चित्रित केला आहे. हे करताना शासन व प्रशासनातील लोकांनी त्यांना दिलेला त्रास, त्याला त्यांनी धिराने दिलेले तोंड, यांचे जबरदस्त चित्रण आलेले आहे. महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेश व त्रिपुरा राज्यात उच्च पदस्थ अधिकारी म्हणून काम करताना त्यांना आलेले विदारक अनुभव त्यांनी कथन केले आहेत.

           आईच्या पोटातील गर्भापासूनच डॉ.केळे साहेबांना आजपर्यंत अनेक संघर्षांना तोंड द्यावे लागले आहे. संघर्षात नाउमेद न होता संघर्षातून तावून-सुलाखून तेजाळण्याची डॉ.मुरहरी केळे यांची एडक्यावाणी खंबीर व कणखर वृत्ती आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या आत्मचरित्राला ‘एडका’ हे मार्मिक नाव दिले आहे. ‘एडका’ हा नायक असून तो अन्याया विरुद्ध पेटून उठतो. अन्याय करणाऱ्यांना तो आपल्या सामर्थ्यशाली डोक्याने धडक देऊन पराभूत करतो.

 ‘एडका’ हे सृजनशील नवनिर्मितीचे व सामर्थ्याचे प्रतीक आहे. ‘एडका’ हे नेतृत्वाचा आदर्श मांडणारे प्रतीक आहे. ‘एडका’ हा कळपाच्या संरक्षणाची जबाबदारी घेतो. ‘एडका’ हा भूमीशी कृतज्ञता सांगणारा आदिम ऋणानुबंध आहे. ‘एडका’ पशुपालकांच्या श्रीमंतीचे, अभिमानाचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे.  डॉ. मुरहरी केळे यांच्यात एडक्याचे हे सर्व गुण ठासून भरलेले आहेत. म्हणूनच आपल्या पशुपालक परंपरेशी, समाजाशी असणारी अतूट नाळ अधिक घट्टपणे सांगताना त्यांनी आपल्या आत्मचरित्राचे ‘ एडका ‘ हे नाव जाणीवपूर्वक ठेवलेले आहे. ‘एडका’ वीरतेचे प्रतीक आहे. वाटेत आडवे येणाऱ्यांना धडका देत नामोहरम करत तो वाटचाल करतो. एडक्याचा दरारा माहीत असल्यामुळे त्याच्या वाट्याला न जाता त्याच्यापासून चार हात दूर राहण्यातच लोक धन्यता मानतात.

            ‘एडका’ मध्ये कुटुंब, गाव, भावकी,समाज, नातेवाईक,नोकरीच्या ठिकाणी भेटलेली माणसे व तिथला संघर्ष यांचे अनेक पातळीवरील भेदक चित्रण आले आहे. डॉ. केळे साहेबांनी टोकाच्या दारिद्र्यावर संघर्षशील वृत्तीने केलेली मात, नव्या पिढीतील तरुणाईला खूप मोठे मानसिक बळ देऊन जाईल. अनेक दुःखांचे व संकटांचे प्रसंग ‘ एडका ‘ मध्ये पानोपानी आलेले आहेत. दुःखातही विनोद व खेळकर वृत्तीचे दर्शन घडवीत डॉ.केळे यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे. अधिकारीपणाचा डामडोल व कृत्रिमता यांचे ‘ एडका ‘मध्ये कुठेही दर्शन घडत नाही. डॉ. केळे यांनी गरिबीचे प्रचंड चटके भोगले आहेत. त्याविषयीचा कडवटपणा व आक्रस्ताळेपणा या आत्मचरित्रात कुठेच दिसत नाही. डोळे भरून येणारे दुःख अनेक ठिकाणी आले आहे. दुःखात हार न मानता त्यावर धिराने मात कशी करायची, हा आदर्श डॉ.केळे साहेबांनी नव्या पिढीला ‘एडका ‘मधून घालून दिला आहे. अत्यंत प्रेरणादायी, शैलीदार, चिंतनशील व दुःखालाही विनोदाची झालर देणारे हे संस्मरणीय आत्मचरित्र आहे.

            डॉ. मुरहरी केळे यांच्या कर्तृत्वाचा आवाका प्रचंड आहे. तो एका आत्मचरित्राच्या पुस्तकात मावणारा नक्कीच नाही. अजूनही त्यांचे कर्तृत्व विस्तारत आहे. ‘एडका’ हे आत्मचरित्र मराठी साहित्याला खूप मोठी ऊर्जा देऊन गेले आहे. वारकरी संप्रदायातील संस्कारांमुळे उच्च नैतिकतेचा वेगळा आदर्श प्रशासनातही आपल्या व्यक्तिमत्त्वातून डॉ.केळे साहेबांनी निर्माण केला आहे . तो ‘एडका’ मध्ये पानोपानी  दिसतो. मातृ -पितृ भक्त बनून आई-वडिलांची पुण्यतिथी गेली १७  वर्षे अखंड हरिनाम सप्ताहाने साजरी करणारा आधुनिक श्रावणबाळ म्हणूनही डॉ. केळे थोर आहेत. आकर्षक भाषाशैली, प्रभावी संवाद, उत्कट घटना व प्रसंग, मनोहरी पात्रचित्रणे, प्रवाही निवेदन, सुंदर वातावरण निर्मिती, टोकदार संघर्ष, सत्यकथन, जागृत समाजभान, मराठवाडा प्रदेशातील लोकजीवनाचे दर्शन, या दृष्टीने ‘एडका’  हे आत्मचरित्र खूपच दमदार बनलेले आहे. लेखकाचे कणखर व्यक्तिमत्व पानोपानी प्रभावीपणे प्रकट झाले आहे. अभावग्रस्त परिस्थितीने गांजलेल्या आणि उपेक्षित वर्गातील सर्व समाजातून येणाऱ्या तरुणांसाठी ‘एडका’ दीपस्तंभ आणि लढाऊ ऊर्जेचे पॉवर स्टेशन म्हणून नक्कीच भूमिका पार पाडेल, असा विश्वास वाटतो. तेजाचं वरदान लाभलेल्या महान प्रकाशयात्री बहुआयामी व अवलिया अभियंत्याच्या ‘एडका’ या प्रांजळ आत्मचरित्राचे मराठी साहित्य विश्वात वाचक आणि समीक्षक नक्कीच स्वागत करतील.

प्रा. मुकुंद वलेकर, सांगोला.

मो. नं. ९९२१३८३००५

 (डॉ.मुरहरी केळे यांच्या ‘एडका’ या आत्मचरित्राचे प्रकाशन दि.१० मार्च २०२४ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. त्यानिमित्त ‘डॉ.केळे’ आणि ‘एडका’ यांचा थोडक्यात परिचय करून देणारा प्रा.मुकुंद वलेकर यांचा लेख आम्ही प्रसिद्ध करत आहोत. )