केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचं निधन

राम विलास पासवान यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांचे निधन झाले आहे.रामविलास पासवान हे लोकजनशक्ती पार्टी (लोजपा) चे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांच्या पक्ष केंद्रातील मोदी सरकारमध्ये सहभागी आहे. ७३ वर्षीय पासवान यांनी लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. तर ते राज्यसभा सदस्य होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मुलगा चिराग पासवान यांनी आपल्या वडिलांच्या निधनाची माहिती सोशल मीडियावर दिलीय.

‘बाबा… तुम्ही या जगात नाहीत पण मला माहीत आहे की तुम्ही जिथे कुठे आहात सदैव माझ्यासोबत आहात’ असे ट्विट चिराग पासवान यांनी केले आहे. बिहारच्या राजकारणात रामविलास पासवान यांचा मोठा दबदबा आहे. पासवान यांनी १९६० च्या दशकात राजकारणाची सुरुवात केली. पहिल्यांदा आमदार राहिलेल्या पासवान यांनी हाजीपूर मतदारसंघातून ४ लाख मतांनी विजय मिळवला होता. त्यामुळे ते देशभर चर्चेत आले होते. १९८९ मध्ये विजयी झाल्यानंतर ते पहिल्यांदा व्ही. पी. सिंह यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते एच. डी. देवेगौडा यांच्या सरकारमध्ये मंत्री झाले. गुजराल सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री झाले. केंद्रात सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी रामविलास पासवान हे केंद्रीय मंत्री असतात असा त्यांचा आजपर्यंतचा प्रवास आहे.

राम विलास पासवान यांचा राजकीय प्रवास

– राम विलास पासवान यांनी आठवेळा लोकसभेवर बिहारचे प्रतिनिधीत्व केले. सध्या ते राज्यसभेतून खासदार होते.

– संयुक्त समाजवादी पक्षातून त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. १९६९ साली पहिल्यांदा ते बिहार विधानसभेवर निवडून गेले.

– १९७४ साली त्यांनी लोक दलमध्ये प्रवेश केला आणि सरचिटणीस बनले.

– १९७५ मध्ये त्यांनी आणीबाणीला विरोध केला. त्यासाठी त्यांना तुरुंगातही जावे लागले.

– १९७७ साली जनता पार्टीच्या तिकिटावर हाजीपूर मतदारसंघातून त्यांनी पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकली.

– त्यानंतर १९८०, १९८९, १९९६, १९९८, १९९९, २००४ आणि २०१४ मध्ये त्यांनी लोकसभेमध्ये बिहारचे प्रतिनिधीत्व केले.

– २००० साली राम विलास पासवान यांनी लोक जनशक्ती पार्टीची स्थापना केली.

– २००४ साली त्यांनी काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते रसायन आणि खत मंत्री होते.

– २००४ साली राम विलास पासवान यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली पण २००९ साली ते पराभूत झाले.

– २०१० साली ते पुन्हा राज्यसभेवर निवडून गेले. २०१४ मध्ये त्यांनी हाजीपूरमधून पुन्हा लोकसभेची निवडणूक जिंकली.

– २०१४ पासून ते भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये होते. मोदी सरकारमध्ये दुसऱ्यांदा त्यांच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

राम विलास पासवान यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री राम विलास पासवान यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

केंद्रीय मंत्री श्री राम विलास पासवान यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. पासवान हे व्यापक जनाधार असलेले बिहार राज्यातील लोकप्रिय नेते होते. केंद्रातील अनेक सरकारांमध्ये त्यांनी मंत्री म्हणून कार्य करताना विविध खाती समर्थपणे सांभाळली. पासवान यांचा आणि माझा घनिष्ट परिचय होता. त्यांच्या निधनामुळे देशाने एक उत्तम संसदपटू आणि लोकप्रिय नेता गमावला आहे. दिवंगत आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना करतो तसेच त्यांच्या कुटुंबियांना आपल्या शोक संवेदना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले दुःख

केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष #रामविलासपासवान यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले दुःख. राजकारणात प्रदीर्घ अनुभव असलेल्या पासवान यांची सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेली होती, त्यांच्या निधनाने शोषित, दुर्बल घटकांसाठी लढणारा नेता हरपला.

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनाने अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दुःख

मुंबई, दि. 8 : केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान यांच्या निधनाबद्दल अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दुःख व्यक्त केले आहे.

बिहारच्या राजकारणात रामविलास पासवान यांचा मोठा दबदबा असून देशातील दलित चळवळीमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. पासवान यांनी १९६० च्या दशकात राजकारणाची सुरुवात  पहिल्यांदा आमदार राहिलेल्या पासवान यांनी हाजीपूर मतदारसंघातून ४ लाख मतांनी विजय मिळवला होता. त्यामुळे ते देशभर चर्चेत आले होते. १९८९ मध्ये विजयी झाल्यानंतर ते पहिल्यांदा व्ही. पी. सिंह यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट म्हणून काम पाहिले. त्यानंतर ते एच. डी. देवेगौडा यांच्या सरकारमध्ये मंत्री झाले. गुजराल सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री झाले. केंद्रात आलेल्या विविध सरकारमध्ये त्यांचा सहभाग होता. राजकारणातील त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या वतीने राज्यात राबविण्यात येत असलेल्या अन्न, धान्य वाटपाच्या योजनेत त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या निधनाने देशाच्या राजकारणातील एक अनुभवी नेत्याला जनता कायमची मुकली आहे.