वंचितच्या भूमिकेने ‘मविआ’तील जागावाटपाचा तिढा वाढला

मुंबई,६ मार्च / प्रतिनिधी :-लोकसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याचे नाव घेताना दिसत नाही. त्यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील चारही प्रमुख पक्षांची जागा वाटपासंदर्भातील बैठक पार पडली. मात्र या बैठकीत वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या जागा वाटपाच्या फॉर्मुल्याने मविआतील तिढा सुटण्याऐवजी वाढला असल्याचं दिसून येत आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत हॉटेल ट्रायडंट येथे बैठका झाल्या. या बैठकांमध्ये वंचित बहुजन आघाडीने २७ जागांवर आमची तयारी असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने अकोला, अमरावती आणि रामटेक या जागांवर दावा सांगितला होता. तसेच वंचितने जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवताना अल्पसंख्यांक, ओबीसी आणि मराठा समाजाला प्रतिनिधित्व देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आज वरळी येथील हॉटेल फोर सिजन येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे या बैठकीत जागा वाटपाचा तिढा सुटला जाण्याची आणि फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र वंचित बहुजन आघाडीने पाच जागांची मागणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा कायम आहे.

वंचितने मागणी केलेल्या ५ जागा कोणत्या?

वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीतील पक्षांकडे अकोला, अमरावती, रामटेक, दिंडोरी आणि सोलापूर या जागांची मागणी केली आहे. मात्र यामध्ये रामटेकच्या जागेवर शिवसेना आणि काँग्रेसनेही दावा केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याबरोबरच अमरावती आणि सोलापूर या जागांवर काँग्रेसने दावा केला आहे. तर दिंडोरी या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने दावा केला आहे. त्यामुळे या जागांवरून तिढा वाढला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रकाश आंबेडकर निघून गेल्यानंतरही बैठक सुरू

प्रकाश आंबेडकर फोर सीजन या हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीला उशीरा आले होते. त्यानंतर तीन तास जागा वाटपावरून चर्चा सुरू होती. यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा प्रस्ताव दिला. त्यानंतर ते बैठकीतून निघून गेले. त्यानंतरही बैठक सुरू होती. या बैठकीत ३९ जागांवर एकमत झाल्याची माहिती आहे. मात्र ९ जागांवर तिढा कायम होता. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी ५ जागांची मागणी केल्याने हा तिढा आणखी वाढला असल्याचं दिसून येत आहे.