देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न जाहीर

पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन 

 नवी दिल्ली,३ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- भारतीय जनता पक्षाचे नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना केंद्र सरकारकडून देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वरुन याबाबतची माहिती दिली असून आडवाणी यांचे अभिनंदनही केले आहे. केंद्र सरकारकडून काही दिवसांपूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ जाहीर करण्यात आला. आता केंद्राकडून आडवाणी यांना ‘भारतरत्न’ जाहीर करण्यात आला आहे.

“श्री लालकृष्ण आडवाणीजी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. मी त्यांच्याशी बोलून हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ते आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक असून भारताच्या विकासातील त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. तळागळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून देशाची सेवा करण्यापर्यंत त्यांचा प्रवास होता. आपले गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणूनही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्यांची संसदीय कारकिर्द समृद्ध राहिली आहे”, असे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या ‘एक्स’पोस्टमध्ये म्हटले आहे.

पाकिस्तानातील कराचीत झाला जन्म-

लालकृष्ण आडवाणी यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९२७ रोजी पाकिस्तानातील कराची इथे झाला. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर त्यांचे कुटुंबाने भारतात जाण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी आडवाणी यांचे प्राथमिक शिक्षण लाहोर येथे झाले. त्यांनी मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवीही घेतली आहे. आडवाणी यांचा २५ फेब्रुवारी १९६५ साली कमला आडवाणी यांच्यासोबत विवाह झाला, त्यांना दोन अपत्य आहेत.

लालकृष्ण आडवाणी यांचे राजकीय जीवन-

१९५१ साली जनसंघाची स्थापना झाली. तेव्हापासून आडवाणी यांनी १९५७ पर्यंत जनसंघाचे सचिव म्हणून काम पाहिले. पुढे ते जनसंघाचे अध्यक्षही बनले. १९८० साली भाजपची स्थापना झाल्यानंतर १९८६ पर्यंत त्यांनी भाजपचे सरचिटणीसपद भूषवले. १९८६ ते १९९१ या काळात आडवाणी पक्षाचे अध्यक्ष होते.

भाजपने १९९० साली आडवाणींच्या नेतृत्वात अयोध्येतील राम मंदिरासाठी आंदोलन सुरु करत सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा काढली. या रथयात्रेला हिंदु समुदयाचा मोठा पाठिंबा मिळाला. या यात्रेदरम्यान त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली. मात्र, या कारवाईमुळे त्यांचे राजकीय वजन आणखीनच वाढले.

आडवाणी हे तीन वेळा भाजपचे अध्यक्ष, चार वेळा राज्यसभा खासदार आणि पाच वेळा लोकसभा खासदार राहिले आहेत. १९७७ ते १९७९ या काळात ते पहिल्यांदा केंद्रात कॅबिनेट मंत्री होते, यावेळी त्यांच्याकडे माहिती व प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी होती. त्यांनी १९९८-२००४ दरम्यान भाजपच्या नेतृत्वातील एनडीए सरकारमध्ये गृहमंत्री म्हणून काम पाहिले. तर, २००२-२००२ या काळात ते देशाचे उपपंतप्रधान होते. आडवाणी यांना २०१५ साली देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

आपल्या दीर्घ सार्वजनिक जीवनात, आडवाणी यांनी यांनी देश, संस्कृती आणि लोकांसाठी अथक लढा दिला-केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह 

ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न सन्मान जाहीर झाल्याबद्दल, गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आनंद व्यक्त केला आहे.

X या समाजमाध्यमावर आपल्या भावना व्यक्त करत, शाह यांनी लिहिले आहे, की लालकृष्ण आडवाणी यांनी आपले संपूर्ण जीवन, निस्वार्थीपणे देश आणि देशातील नागरिकांना समर्पित केले. देशाचे उपपंतप्रधान होण्यासह, विविध घटनात्मक पदांची जबाबदारी सांभाळतांना, त्यांनी आपल्या नेतृत्वगुणांचा कस लावत,  देशाची सुरक्षा, एकता आणि अखंडता कायम राखण्यासाठी, अभूतपूर्व काम केले. आडवाणी जी असे नेते आहेत, ज्यांनी राजकारणात, सचोटीचा एक मापदंड निर्माण केला, असंही शाह म्हणाले.  देश, देशाची संस्कृती आणि इथले लोक यांच्या भल्यासाठी त्यांनी अथक लढा दिला. पक्ष आणि पक्षाची विचारसरणी मजबूत करण्यासाठी त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचे वर्णन शब्दबद्ध करणे कठीण आहे, असेही शाह म्हणाले. आडवाणी जी यांना मिळालेले ‘भारत रत्न’हा संपूर्ण देशबांधवांचा सन्मान आहे. असे अमित शाह म्हणाले. 

‘…अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या सुपुत्राचा गौरव’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे अभिनंदन

मुंबई:- अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भारत सुपुत्राचा देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणे हे आनंददायी आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ नेते, देशाचे माजी उपप्रधानमंत्री लालकृष्ण अडवाणी यांचे भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. 

“प्रखर राष्ट्रभक्त अशा ज्येष्ठ नेते अडवाणी जी यांनी आपले अखंड आयुष्य समाजकारण आणि राजकारण यासाठी समर्पित केले आहे. अयोध्येत प्रभु श्रीरामचंद्राचे मंदिर व्हावे हे त्यांचे स्वप्न देखील साकार झाले आहे. या मंदिरासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, रथयात्रेचे नेतृत्व या गोष्टी त्यांच्या प्रभावी नेतृत्वशैलीचे उदाहरण आहे. देशाच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी असणारे आणि सर्वसमावेशक असे त्यांचे नेतृत्व आमच्यासाठी प्रेरणादायी आणि आदरणीय आहे. उत्तम संसदपटू आणि परखड विचारांचे नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. त्यांना देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर होणे अत्यंत आनंददायी बाब आहे. त्यांना उत्तम आयुरारोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, असे अभिष्टचिंतन करून मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नेते श्री. अडवाणी यांचे भारतरत्न पुरस्काराबद्दल अभिनंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले अभिनंदन

उत्कृष्ट संसदपटू, समाजकारणातील समर्पित नेतृत्व असणारे, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हणतात की, भारताचे माजी उपप्रधानमंत्री, गृहमंत्री म्हणून श्री. लालकृष्ण अडवाणी यांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. देशाच्या हिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या मुद्द्यांवर त्यांनी संसदेत बेधडक आणि ठामपणे आपली मते मांडली. देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे. भारतरत्न पुरस्काराबद्दल श्री. अडवाणी यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.