लखपती दीदी योजनेचे उद्दिष्ट 2 कोटींवरून 3 कोटींपर्यंत वाढविणार : अर्थमंत्री निर्मला सीतारामन

लखपती दीदी बनण्यासाठी सरकारची सुमारे 1 कोटी महिलांना सहाय्य

नऊ कोटी महिलांसह 83 लाख स्वयंसहायता गटांनी सक्षमीकरण आणि स्वावलंबनाच्या माध्यमातून ग्रामीण सामाजिक-आर्थिक परिप्रेक्षात बदलत घडवल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे गौरवोद्गार

नवी दिल्ली ,१ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-लखपती दीदी योजनेचे उद्दिष्ट 2 कोटींवरून 3 कोटींपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना सांगितले.  

अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, नऊ कोटी महिलांसह 83 लाख स्वयंसहायता गटांनी सक्षमीकरण आणि स्वावलंबनाच्या माध्यमातून ग्रामीण सामाजिक-आर्थिक परिप्रेक्षात बदलत घडविला आहे. त्यांच्या यशाने यापूर्वीच एक कोटी महिलांना लखपती दीदी बनायला सहाय्य मिळाले आहे. त्या इतरांसाठी प्रेरणादायक ठरल्या आहेत. त्यांचा गौरव करून त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेतली जाईल. या यशाने प्रेरित होऊन लखपती दीदी योजनेचे उद्दिष्ट आणखी वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अर्थमंत्री म्हणाल्या की, आपण गरीब, महिला, युवा आणि अन्नदाता (शेतकरी) या चार प्रमुख जातींवर लक्ष केंद्रित करायला हवे, यावर आपल्या पंतप्रधानांचा ठाम विश्वास आहे. त्यांच्या गरजा, त्यांच्या आकांक्षा आणि त्यांचे कल्याण हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. ते जेव्हा प्रगती करतात, तेव्हा देशाची प्रगती होते, असे त्या म्हणाल्या. चौघांनाही त्यांचे जीवन सुकर बनवण्यासाठी सरकारी मदतीची आवश्यकता असते, आणि ती त्यांना प्रदान केली जाते. त्यांचे सक्षमीकरण आणि कल्याण देशाला पुढे नेईल, असे त्यांनी अधोरेखित केले.  

सर्वांगीण, सर्वव्यापी आणि सर्वसमावेशक असा विकासाचा दृष्टीकोन ठेवून सरकार काम करत आहे, यावरही त्यांनी भर दिला. यामध्ये सर्व जाती आणि सर्व स्तरातील लोकांचा समावेश होतो. आमचे सरकार भारताला 2047 पर्यंत ‘विकसित भारत’ बनविण्यासाठी काम करत आहे.  “हे ध्येय साध्य करण्यासाठी, लोकांची क्षमता वाढवण्याची आणि त्यांना सक्षम बनवण्याची गरज आहे”, असे त्यांनी सांगितले.