पाच एकात्मिक एक्वापार्क उभारण्यात येणार


2013-14 पासून सीफूड निर्यातीत दुपटीने वाढ

मत्स्य संपदा योजनेला गती देणार, जलशेती उत्पादकता वाढवणार, निर्यात 1 लाख कोटी पर्यंत दुपटीने वाढवणार आणि 55 लाख रोजगाराच्या संधी निर्माण करणार

नील अर्थव्यवस्था 2.0 साठी हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी नवीन योजना सुरू केली जाणार

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वसमावेशक कार्यक्रम आखण्यात येणार

नवी दिल्ली ,१ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  मत्स्यव्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी  पाच एकात्मिक एक्वापार्क उभारले जातील असे केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले .  आज संसदेत 2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना त्या म्हणाल्या, “आमच्या सरकारने मच्छिमारांना मदत करण्याचे महत्त्व ओळखून मत्स्यव्यवसायासाठी स्वतंत्र विभाग स्थापन केला. यामुळे देशांतर्गत आणि जलशेती  उत्पादनात दुप्पट वाढ झाली आहे.” 2013-14 पासून सीफूडच्या निर्यातीतही दुपटीने वाढ झाल्याचे अर्थमंत्र्यांनी अधोरेखित केले.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्यात येईल : (i) जलशेती उत्पादकता सध्याच्या 3 वरून वाढवून 5 टन प्रति हेक्टर करणार; (ii) निर्यात दुपटीने वाढवून 1 लाख कोटीवर नेणार; (iii) नजीकच्या काळात 55 लाख रोजगाराच्या संधी निर्माण करणार

नील अर्थव्यवस्था  2.0

नील अर्थव्यवस्था 2.0 साठी हवामान बदलाला सामोरे जाण्यास सक्षम गतिविधींना चालना देण्यासाठी, पुनर्संचयित आणि अनुकूलन उपायांसाठी एकात्मिक आणि बहु-क्षेत्रीय दृष्टिकोनासह किनारपट्टीवर जलशेती आणि मत्स्यपालन योजना सुरू केली जाईल अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. .

दुग्धव्यवसाय विकास

दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सर्वसमावेशक कार्यक्रम आखला जाईल  अशी घोषणाही त्यांनी केली. जनावरांमधील पाय आणि तोंडाचे आजार आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत असे त्या म्हणाल्या.  “भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे परंतु दुभत्या जनावरांची उत्पादकता कमी आहे.” राष्ट्रीय गोकुळ मिशन, राष्ट्रीय पशुधन अभियान आणि डेअरी प्रक्रिया आणि पशुसंवर्धनासाठी पायाभूत सुविधा विकास निधी यासारख्या विद्यमान यशस्वी योजनांच्या धर्तीवर  हा कार्यक्रम तयार केला जाईल, असे त्या म्हणाल्या.