छत्रपती संभाजीनगरमध्ये वर्षभरात ५७ हजार वीजजोडण्या

जोडणी देण्याचा सरासरी कालावधी आला आठवड्यावर ;महावितरणची लक्षणीय कामगिरी

छत्रपती संभाजीनगर ,९ जानेवारी / प्रतिनिधी :- नवीन वीजजोडण्या देण्यासाठी महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाने वेगवान व तत्पर कार्यवाही करीत २०२३ मध्ये सर्व वर्गवारीमध्ये ५६ हजार ६९७ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत. तसेच नवीन वीजजोडण्या देण्यासाठी गतवर्षी लागणारा सरासरी दीड महिन्याचा कालावधीही केवळ एका आठवड्यावर आणण्यात महावितरणला यश आले आहे.

          छत्रपती संभाजीनगर परिमंडलामध्ये दरवर्षी 40 ते 50 हजार नवीन वीजजोडण्या देण्यात येतात. मात्र यंदा वीजजोडण्या देण्यास नियोजनपूर्वक वेग देण्यात आला आहे. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी  सरकारने ‘इझ ऑफ लिव्हिंग‍’ संकल्पना आणली आहे. यात वीजपुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यानुसार ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठ्यासह सर्व सेवा तत्परतेने देण्याचे आदेश महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहेत. यात छत्रपती संभाजीनगर परिमंडलाने नवीन वीजजोडणी तत्परतेने देण्यासह खंडित वीजपुरवठा, बिलिंग व ग्राहकांच्या इतर तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यात राज्यात आघाडी घेतली आहे.

          वीज ही मूलभूत गरज आहे. ही महत्त्वाची गरज भागवण्यासाठी ग्राहकांना फारवेळ लागू नये यासाठी ग्राहकांना नवीन वीजजोडणीसह सर्व सेवा तत्परतेने देण्यावर महावितरणचा भर आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडलात मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रलंबित वीजजोडणी देणे, ग्राहकांच्या वीजपुरवठ्याच्या तक्रारी, बिलिंगच्या तक्रारी, इतर तक्रारी निर्धारित कालावधीत निकाली काढणे तसेच वितरण रोहित्र वेळेत बदलणे या पाच मुद्द्यांवर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या  होत्या. डॉ.केळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार छत्रपती संभाजीनगर ‍परिमंडलात मिशन मोडवर काम करत वीजजोडण्या देण्यासह तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे.

 छत्रपती संभाजीनगर ‍परिमंडलात मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे हे गतवर्षी मे महिन्याच्या अखेरीस रूजू झाल्यानंतर नवीन वीजजोडण्यांच्या प्रगतीसह वीजग्राहकांच्या तक्रारींचा व त्यावर केलेल्या उपायांचा नियमित आढावा घेत आहेत. त्यामुळे नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया अधिक गतिमान झाली व 2023 मध्ये सर्व वर्गवारीतील 56 हजार 697 ग्राहकांना नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. प्रलंबित जोडण्यांचे अर्जही एका आठवड्यात निकाली काढण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या कालमर्यादेत वीजजोडण्या देण्यावर भर आहे. छत्रपती संभाजीनगर  परिमंडलात गतवर्षी मे महिन्यात नवीन जोडण्या देण्याचा सरासरी कालावधी सुमारे 45 दिवस होता. मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर अभियंते, कर्मचाऱ्यांच्या नियमित बैठका घेऊन प्रलंबित जोडण्या तत्परतेने देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे नवीन वीजजोडणी देण्याची सरासरी कालावधी डिसेंबरअखेरीस केवळ एका आठवड्यावर आला आहे.

2023 मध्ये घरगुती- 41414, वाणिज्यिक- 5 882, औद्योगिक- 1617 आणि कृषि व इतर 7784 अशा एकूण 56  हजार 697 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या. यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहर मंडलात 15831, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मंडलात 25927 तर जालना मंडलात 14939 नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.

‍——————————————————-

    सन 2023 मध्ये छत्रपती संभाजीनगर परिमंडलात जवळपास 57 हजार नवीन वीजोडण्या देण्यात आल्या ही समाधानाची व आनंदाची बाब आहे. हा वेग आणखी वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच नियामक आयोगाच्या कृती मानकांनुसार निश्चित केलेल्या कालावधीत वीजग्राहकांना सेवा देण्यासाठी  परिमंडलातील सर्व अभियंता, अधिकारी व कर्मचारी कटिबद्ध आहेत.

–         डॉ.मुरहरी केळे, मुख्य अभियंता, महावितरण

———————————————————————–