“खोक्यात बंद झालेल्यांना पुन्हा घरात घेणार नाही”, उद्धव ठाकरे शिंदे गटावर बरसले

अभिनेता किरण माने यांचा शिवसेनेत प्रवेश 

मुंबई,७ जानेवारी / प्रतिनिधी :-“भटकंतीला गेलेल्या, खोक्यात बंद झालेल्यांना पुन्हा घरात घेणार नाही. खोक्यात बंद झालेल्यांना खोक्यातून परत काढण्याची गरज नाही”, असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केला आहे. उल्हासनगर येथील राजेश वानखेडे यांनी आज शेकडो सहकाऱ्यांसह उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवबंधन हाती बांधले. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे शिंदे गटावर चांगलेच बरसले.

पक्षप्रवेश करताना, राजेश वानखेडे यांनी “आज आपल्या घरात आल्यासारखे वाटते”, अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “तुम्ही फार महत्वाच्या शब्दांमध्ये भावना मांडल्या. पण, काही जण बाहेर भटकंतीला गेले आहेत. त्यांना परत घरात घेणार नाही. कारण जे खोक्यात बंद झालेत त्यांना पुन्हा खोक्यातून बाहेर काढण्याची गरज नाही.” यावेळी शिवसैनिकांनी ’50 खोके एकदम ओके’, अशा घोषणा दिल्या.

नाशिकला येण्य़ाचे आवाहन-

आमच्याकडे शिवसैनिकांची माया, प्रेम, जिद्द, हिम्मत आहे. तुम्ही परत आलात तुमचे स्वागत आहे. लढाई फार मोठी आहे. आपल्यासमोर खोकेवाले आहेत. एवढे खोके घेऊनही घटनाबाह्य सरकारला उठता बसता मीच दिसतो. 23 जानेवारीला नाशिकच्या काळाराम मंदिरात कार्यक्रम जाहीर केला आहे. काळाराम मंदिरात जाऊन रामाचे दर्शन घेणार आहोत. 23 तारखेला नाशिकला सर्वांनी या, असे आवाहनही ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले.

तिन्ही निडणुका एकत्र घ्या-

यावेळी ठाकरे यांनी विरोधी पक्षाला निवडणुका घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, तुम्ही तिन्ही निवडणुका घ्या. लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडणूका एकत्र लावा. गल्लीपासून दिल्लीपर्यंत काय आहे ते कळेल. लवकरच राम राज्य येणार असल्याचेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

मराठी अभिनेत्याचा ठाकरे गटात प्रवेश; उद्धव ठाकरेंच्या हातून बांधले शिवबंधन

‘बिग बॉस मराठी’ आणि ‘मुलगी झाली हो’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले अभिनेते किरण माने यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर त्यांनी शिवबंधन बांधत पक्षप्रवेश केला. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या माध्यमातून माने यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. काही महिन्यांपूर्वी राजकीय भूमिका घेतल्याने एका मनोरंजनक करणाऱ्या वाहिनीने मालिकेतून काढल्याचा आरोप माने यांनी केला होता. यावेळी ठाकरे गटाचे अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते.

“शिवसेना सर्वसामान्यांची आहे. राजकारण गढूळ झालेले असताना एकटा माणूस लढत आहे. त्यामुळे मी एक संवेदनशील अभिनेता म्हणून माणूस म्हणून सोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. संविधान वाचवण्यासाठी मी पक्षामार्फत काम करेल. मिळेल ती जबाबदारी घेऊन काम करेल”, असे माने यावेळी म्हणाले. बऱ्याच दिवसांपासून ते राजकारणात जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आज त्यांच्या ठाकरे गटात प्रवेशाने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

राजकीय पोस्टमुळे आले होते अडचणी-

किरण माने हे कलकार असून त्यांच्या ठाम राजकीय भूमिकेमुळे देखील ते ओळखले जातात. त्यांची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत ‘विलास पाटील’ हे पात्र साकारत असताना त्यांनी ही पोस्ट केली होती. त्यानंतर त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. त्यावेळी राजकीय दबावातून वाहिनीने मालिकेतून काढले असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

अनेक कार्यकर्त्यांच्याही हाती शिवबंधन-

माने यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा देखील ठाकरे गटात प्रवेश पार पडला. उद्धव ठाकरे यांनी या सर्वांना शिवबंधन बांधून त्यांना ठाकरे गटात प्रवेश दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना “आपल्या घरात आल्यासारखे वाटतेय. पूर्वी शिवसैनिक होतो, आजही शिवसैनिक आहे”, अशी भावना व्यक्त केली.