आणि स्वतःच टुणकन उडी मारुन मुख्यमंत्री बनले!-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

पुणे ,६ जानेवारी / प्रतिनिधी :- आपल्याला पदाचा मुख्यमंत्रिपदाचा मोह कधीच नव्हता आणि नाही. आपण जी भूमिका घेतली ती शिवसेना वाचवण्यासाठी आणि शिवसेनेचे (Shivsena) खच्चीकरण थांबवण्यासाठी घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सत्तेचा लोभ मनामध्ये ठेवून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी अशी आघाडी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ते पुण्यातील खेडमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या शिवसंकल्प अभियानामध्ये बोलत होते.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना १९८५ साली मुख्यमंत्री होता आले असते. पण त्यांनी आपल्या सहकाऱ्याला मुख्यमंत्री बनवले. पण २०१९ मध्ये संधी आल्यावर स्वतःच टुणकन उडी मारुन उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी स्वतःच पदावर जाऊन बसले, अशी टीका करत मुख्यमंत्रिपद घेऊन काय मिळवलं? काय गमावलं याचा विचार त्यांनी करावा, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी महाविकास आघाडीच्या काळात नगरविकास खात्याचा मंत्री होतो. माझ्यासोबत शिवसेनेचे सात-आठ मंत्री बाहेर पडले. सत्तेवर लाथ मारुन कुणी जात नाही, सत्तेच्या दिशेने जात असतात. पण सत्ता सोडण्याचे काम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना टिकवण्यासाठी आम्ही केले, असेही यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

जर बंड करायचे असते तर २०१९ ला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला त्यानंतर जे काही घडू लागले त्याचवेळी केले असते. पण त्यावेळेस माझ्या मनात तेव्हाही नव्हतं आणि आत्ताही नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे.

राज्यातील अंगणवाडीसेविकांचा प्रश्न मार्गी लावल्याशिवाय हे सरकार राहणार नाही. एक बैठक त्यावर झाली आहे. एसटीमध्ये महिलांना ५० टक्के सवलत देण्याचे काम आपल्या सरकारने केले आहे.