“…तर एकनाथ शिंदेंना उलटं टांंगलं असतं!” म्हणणाऱ्या खैरेंविरोधात गुन्हा दाखल

औरंगाबाद, ९ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर शिंदे गटाकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “आज आनंद दिघे असते तर गद्दारी केल्याने त्यांनी एकनाथ शिंदेंना उलटे टांगले असते” असे विधान चंद्रकांत खैरे यांनी केले होते. निवडणूक आयोगाकडून शिंदे – ठाकरे वादावर घेतल्या गेलेल्या सुनावणीवर पक्षाचे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दोन्ही गोठावले गेले आहे, यावरूनच चंद्रकांत खैरेंनी एकनाथ शिंदेंवर व्यक्त केलेला त्रागा त्यानं भोवला आहे.
 
 
निवडणूक आयोगाचा निर्णय हा लोकशाहीचा खून आहे, आज भाजपच्या हातात सर्वच यंत्रणा आहेत आणि त्यांचा ते हवा तसा वापर करत आहेत. आमच्यार जे संकट आले आहे त्याचा आम्ही सर्व जण धैर्याने सामोरे जाणार आहोत आणि गद्दारांना धडा शिकवणार आहोत. त्यामुळे अंतिम विजय आमचाच असणार आहे असा दावा खैरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी फक्त हात जरी वर केला तरी त्याचे परिणाम भयानक होतील असा इशाराही चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे . शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गोठले गेल्याची कारवाई ठाकरे गटाला चांगलीच झोंबली आहे.
 
 
शिंदे गटाने चंद्रकांत खैरेंवर गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्र्यांबद्दल ही अशी खालच्या पातळीची भाषा वापरली आणि त्यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत आरोप केले म्हणून खैरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांसारख्या एवढ्या मोठ्या पदावरच्या व्यक्तीबद्दल ते असे विधान कसे काय करू शकले असा सवाल शिंदेगटाकडून केला गेला आहे.