वाळूज येथील आगीच्या दुर्घटनेतील मृत कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर

छत्रपती संभाजीनगर,३१ डिसेंबर / प्रतिनिधी :- छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत एका हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीस लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

मध्यरात्री लागलेल्या या आगीत सहा कामगारांचा जळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

याशिवाय जखमी कामगारांना तातडीने शासकीय खर्चाने सर्व वैद्यकीय उपचार द्यावेत अशाही सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. आग शमविण्यासाठी तसेच अडकलेल्यांना सुखरूप काढण्यासाठी करण्यात आलेल्या बचाव कार्याची माहितीही त्यांनी घेतली व हे मदत कार्य व्यवस्थित पार पडण्यास सांगितले.

या अपघातात ६ मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर ४ जण आपला जीव वाचवण्यात यशस्वी ठरले. ही घटना औद्योगिक क्षेत्रात हाताचे मोजे बनवणारी कंपनी सनशाईन एंटरप्रायजेसमध्ये झाली आहे.ही दुर्घटना ३० डिसेंबरच्या रात्री घडली होती. या कंपनीत १० कामगार झोपले होते. मोजे बनवणारी कंपनी सनशाईन एंटरप्रायजेस सी २१६, वालाज औद्योगिक क्षेत्रात २० ते २५ कामगारांना रोजगार दिला जातो. १० कामगार कंपनीतच राहत होते. गेल्या रात्री जेव्हा सर्व लोक बाहेर झोपत होते तेव्हा अचानक उष्णता वाढल्याने झोपलेले कर्मचारी जागी झाले. दारावरच आग लागल्याने त्यांना बाहेर पडताच आले नाही. मात्र काही कागारांना पत्रा उचलून झाडाच्या मदतीने बाहेर आले.

अग्नितांडवात मृत झालेल्यांत एका ज्येष्ठ कामगार आणि एका अठरा वर्षीय युवकाचाही समावेश आहे. अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार मुश्ताक शेख (वय ६५), कौशर शेख (३२), इक्बाल शेख (१८), ककनजी (५५), रियाजभाई (३२), मरगुम शेख (३३) मृतांची नावे आहेत. घाटीत दाखल केलेले मृतदेह जळीत नव्हते. काही कामगारांचा धूरात गुदमरून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.ही दुर्घटना शनिवारी रात्री उशिरा २.१५ वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी जेव्हा टीम पोहोचली तेव्हा फॅक्टरीमध्ये आग लागली होती. या दरम्यान, स्थानिक लोकांनी सांगितले की फॅक्टरीच्या आत ६ जण अडकले होते.यानंतर फायर ब्रिगेडचे कर्मचारी आत आले आणि त्यांनी ६ मृतदेह हाती घेतले. कंपनीमध्ये ज्या वेळेस आग लागली त्यावेळेस १०-१५ कर्मचारी आत झोपले होते. यातील चार जण आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले. मात्र ६ जण आपला जीव वाचवू शकले नाहीत.

दरम्यान, या प्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार वाळूज औद्योगिक वसाहतीतील सी सेक्टर प्लॉट नंबर २१६ मध्ये साबिर शब्बीर शेख राहणार किराडपुरा यांची सनशाइन एंटरप्राइजेस नावाची कंपनी आहे या कंपनीत हात मोजे बनवण्याचे काम चालते. या कंपनीमध्ये असमुद्दिन मुस्ताक शेख हे ठेकेदार आहेत. या सोबतच त्यांची पत्नी किस्मत परवीन शेख, मुलगा मोहम्मद मुजमीन शेख, मुलगी आयेशा शेख यांच्यासह १८ कामगार काम करत होते. यातील बहुतांश कामगार हे बिहार येथील असल्यामुळे ते कंपनीत काम करून तिथेच राहत होते.