राहुल गांधी आता मणिपूर ते मुंबई अशी ‘भारत न्याय यात्रा’ काढणार

है तैयार हम! काँग्रेसचा नारा : नागपुरात आज १३८ व्या वर्धापनदिन

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी आता मणिपूर ते मुंबई अशी ‘भारत न्याय यात्रा’ काढणार आहेत. ही यात्रा भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर असणार आहे. ही यात्रा १४ जानेवारीपासून सुरू होणार असून २० मार्चपर्यंत सुरू राहील.

काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी या यात्रेची घोषणा केली. पत्रकार परिषदेत वेणुगोपाल म्हणाले, “राहुल गांधींनी पूर्व ते पश्चिम अशी एक यात्रा काढावी असे मत काँग्रेस कार्यकारिणी समितीने २१ डिसेंबर रोजी मांडले होते.

“राहुल गांधी यांनीही काँग्रेस कार्यकारिणीचे मत मान्य करत ही यात्रा काढण्यास सहमती दर्शवली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने १४ जानेवारी ते २० मार्च दरम्यान मणिपूर ते मुंबई अशी ‘भारत न्याय यात्रा’ काढण्याचा निर्णय घेतला आहे,” असे वेणुगोपाल यांनी सांगितले.

नागपुरात आज १३८ व्या वर्धापनदिन

काँग्रेस पक्षाच्या १३८ व्या वर्धापन दिनाचा सोहळा नागपूरच्या ‘भारत जोडो’ मैदानात होत आहे. या महामेळाव्याची सर्व तयारी पूर्ण झाली असून देशभरातील काँग्रेसचे प्रमुख नेते नागपुरात दाखल झाले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपुरच्या पवित्र भूमितून परिवर्तानाचा संदेश दिला जाणार आहे. देशात काँग्रेस पक्षासमोर अनेक आव्हाने आहेत. गेल्या काही वर्षांत काँग्रेसचा आलेख ढासळतच चालला आहे. तसेच आता लोकसभा निवडणुकाही तोंडावर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसला पुनश्च हरिओम करावा लागणार आहे. नागपूरच्या महामेळाव्यात काँग्रेसचे वरिष्ठ नेते काय भूमिका मांडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

भाजपने २०१४ सालापासून काँग्रेससमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या करिष्म्यावर भाजपने केंद्रात पुन्हा एकदा बहुमताने सत्ता कमावली. अनेक राज्यांच्या निवडणुकांत देखील भाजपचा आलेख चढताच राहिला आहे. महाराष्ट्रातही २०१९ ला भाजप-शिवसेनेच्या युतीला जनतेने कौल दिला होता. मात्र, मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षांचे वाजले आणि महाविकास आघाडीने जन्म घेतला. ते सरकार देखील शिवसेनेतील अभूतपूर्व बंडाने कोसळले. त्यामुळे महाराष्ट्रातही काँग्रेसला अचानक मिळालेली सत्ता गमवावी लागली. आता पुन्हा एकदा राज्यात महाविकास आघाडी आणि राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीच्या माध्यमातून भाजपाला शह देण्यासाठी काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे.

मात्र, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांसमोरील आव्हान छोटे नाही. एकतर इंडिया आघाडीतील टोकाच्या विरोधी भूमिका असणाऱ्या पक्षांची आणि त्यांच्या नेत्यांची मोट बांधावी लागणार आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून असलेली मोठेपणाची झूल प्रसंगी उतरवून ठेवावी लागणार आहे. त्यातच आता काँग्रेसचा १३८ वा वर्धापनदिन आला आहे. या निमित्ताने नागपूर येथे काँग्रेसची वरिष्ठ नेतेमंडळी हजर राहणार आहेत.

६० वर्षांच्या काँग्रेस सत्तेत पंडित जवाहरलाल नेहरुंपासून डॉ. मनमोहनसिंह यांच्यापर्यंत भारताला एक महाशक्ती म्हणून उभे केले पण दुर्दैवाने मागील १० वर्षात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने देशाला रसातळाला नेले आहे. जाती-धर्माच्या नावाखाली लोकांमध्ये भांडणे लावून देश अधोगतीकडे नेला आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. संसद सुरक्षेवर प्रश्न विचारले म्हणून १५० खासदारांना निलंबित केले पण काँग्रेस अशा कारवायांना भिक घालत नाही. जगातील बलाढ्य ब्रिटिशांना जसे देश सोडून जाण्यास भाग पाडले तसेच या हुकूमशाही भाजपालाही घरी बसवू, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

देश वाचवण्याचा पुन्हा एल्गार

‘‘देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून काँग्रेसच्या झेंड्याखाली देश एकत्र झाला व हजारो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग व बलिदानाने जुलमी, अत्याचारी ब्रिटिशांना देश सोडण्यास भाग पाडले. स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे. आज पुन्हा महाराष्ट्राच्या भूमितून देश वाचवण्याच्या लढाईचा एल्गार पुकारला जात आहे,’’ असे नाना पटोले म्हणाले.