विधान सभा आणि विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर  महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आज, सोमवारपासून मुंबईत सुरू झाले . विधान सभा आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे घेण्यासाठी काँग्रेस सरसावली असून ही माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

विधानसभेतील पक्षनिहाय आमदारांची आसनव्यवस्था कशी राहील, याचा निर्णय विधानसभा सभागृह सुरू झाल्यानंतर होईल. परिणामी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची आमदार संख्या यातून स्पष्ट होईल. शिवाय अधिवेशनाचा पहिला दिवस विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याचे पद रिक्त असल्यामुळे त्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय देतात, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक मोठा गट सरकारमध्ये सहभागी झाला. त्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ घटले आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या म्हणण्यानुसार आता १९-२० आमदार त्यांच्या बाजूला आहेत. काँग्रेसचे विधानसभेत ४४ सदस्य आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून आज अधिवेशन सुरू होताच विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला जाईल. विधिमंडळ काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तसेच माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि ज्येष्ठ सदस्या यशोमती ठाकूर या सर्व नेत्यांकडून विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगितला जात आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नावदेखील चर्चेत आहे. या साऱ्यावर काँग्रेसचे दिल्लीतील पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे  स्पष्ट होईल.