स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेवर राहुल गांधींचा सावध पवित्रा? शेगावच्या भाषणात काय म्हणाले?

शेगाव, १८ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-काँग्रेस खासदार राहुल गांधींनी मंगळवारी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर वादग्रस्त वक्तव्य केले आणि संपूर्ण राज्यात त्यांच्याविरुद्ध आंदोलने आणि मोर्चे काढण्यात आले. मनसे, भाजपने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मोर्चे काढत त्यांच्या सावरकरांवरील भूमिकेचा निषेध केला. राहुल गांधींची शेगावमधील सभा होऊ देणार नाही, असा पवित्रा मनसेने घेतला. पण, पोलिसांनी चिखली नाक्यावर अनके मनसे नेत्यांना, कार्यकर्त्यांना ताब्यात घेत तिथेच थांबवला. यानंतर राहुल गांधी शेगावच्या सभेमध्ये काय बोलतात? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. पण, अंदाजे २३ मिनिटांच्या भाषणात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर एकही शब्द उच्चारला नाही. त्यामुळे ते नरमले का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

यावेळी भाषणामध्ये राहुल गांधी म्हणाले की, “विरोधक विचारत आहेत की भारत जोडो यात्रेची गरज काय? आज देशाच्या कानाकोपऱ्यात भाजपने द्वेष, भीती, दहशत आणि हिंसेचा प्रसार केला आहे. तुम्ही पाहाल तिकडे तुम्हाला द्वेष, भीती आणि हिंसा दिसेल. याविरोधासाठीच भारत जोडो यात्रेची गरज आहे. या यात्रेचा उद्देश मन की बात करण्याचा नाही, तर जनतेचा आवाज ऐकण्याचा, त्यांचं दुःख समजून घेणं हा आहे.” असे म्हणत भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

पुढे त्यांनी म्हंटले की, ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांची आहे. जगाला दिशा देणाऱ्या शिवरायांची ही भूमी आहे. इथे विदर्भातील शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो आहे. विम्याचे पैसे भरुन देखील शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नाही. काही उद्योगपतींचं मात्र हजारो कोटींचं कर्ज माफ केलं जातं, दोन-तीन उद्योगपती देशाचं कर्ज बुडवत आहेत.” असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.

भारत जोडो यात्रेदरम्यान आज राहुल गांधींची आज शेगावमध्ये सभा झाली. सभेआधी राहुल गांधी यांनी शेगावच्या गजानन महाराज मंदिरात दर्शन घेतलं. राहुल गांधी यांनी शेगावच्या गजानन महाराज मंदिरात रांगेत उभे राहत महाप्रसाद ग्रहण केला. आपले ताट स्वत: उचलून वॉश बेसिनमध्ये नेले. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते. राहुल गांधी यांना मंचावर पोहोचताच वारकऱ्यांचा फेटा घालण्यात आला. या सभेआधी मनसेनं राहुल गांधींविरोधात निदर्शनं केली. पोलिसांनी शेगावला पोहोचण्याआधीच काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं.