‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमासाठी १२ जानेवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

मुंबई,२१ डिसेंबर / प्रतिनिधी :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासोबतचा सातवा संवादात्मक कार्यक्रम ‘परीक्षा पे चर्चा’ तालकटोरा स्टेडियम, नवी दिल्ली येथे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. हा कार्यक्रम गेल्या सहा वर्षांपासून शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्यावतीने आयोजित करण्यात येतो. त्यासाठी १२ जानेवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई यांनी केले आहे.

‘परीक्षा पे चर्चा’मध्ये सहभागी होणाऱ्यांची नोंदणी करण्यासाठी आणि त्यांची निवड करण्यासाठी https://innovateindia.mygov.in/mr/ppc-2024 ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्न (MCQ) स्पर्धा आयोजित केली जात आहे. सहावी ते बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलांसाठी, शिक्षक आणि पालकांसाठी सहभाग घेण्याकरीता ऑनलाईन लिंक उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.  या लिंकद्वारे १२ जानेवारी २०२४ पर्यंत नोंदणी करता येईल. सहभागी विद्यार्थी, पालक व शिक्षक देखील प्रश्न विचारू शकतात. सर्व सहभागींना संचालक एनसीइआरटी यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. सन २०२४ करीता सहभाग नोंदविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आलेली आहे.