बारावीच्या परीक्षा रद्द होण्याची चिन्ह, लवकरच अधिकृत निर्णय जाहीर होणार

मुंबई, 2 जून/प्रतिनिधी :-12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी (HSC) महत्वाची बातमी आहे. राज्य सरकार दहावी पाठोपाठ बारावीची परीक्षा रद्द करणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबतचा प्रस्ताव शिक्षण विभागाने आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवलेला आहे. पण अजूनही  बारावीची परीक्षा रद्द करायची की नाही, याबाबत अंतिम निर्णय झाला नाही.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता 10वी) च्या यंदाच्या परीक्षा यापूर्वीच रद्द करण्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर आता उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12वी)च्या यंदाच्या परीक्षा रद्द करण्यावर मंत्रिमंडळ बैठकीत एकमत झाल्याची माहिती समोर आली आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली की, विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. राज्य मंत्रिमंडळात बारावीच्या परीक्षा रद्द करण्यावर एकमत झालं असून आता या संदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठवण्यात येणार आहे आणि त्यानंतर अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे.

यापूर्वी इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याचा तसेच विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेसाठी वाढीव वेळ देण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला होता. मात्र, राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता बारावीच्याही परीक्षा रद्द करण्याची चिन्ह दिसत आहेत.

दरम्यान काल 1 जूनला केंद्र सरकारने सीबीएसई (CBSE)  बोर्डाची 12वी ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. याआधी 20 एप्रिलला दहावीची परीक्षा (SSC) रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.