महाराष्ट्रात रेल्वे पायाभूत सुविधांचे बळकटीकरण

जालना रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट केला जाणार – केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

जालना,३ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- भारत देशाला जगभरातील इतर देशांच्या तुलनेत अधिक विकसनशील बनवण्यासाठी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुढील 25 ते 50 वर्षाची दूरदृष्टी ठेऊन विकास कामे करण्यावर भर देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जालना येथील रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट केला जाणार असुन जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध राजूर येथील गणपती मंदिराच्या प्रतिकृतीप्रमाणे नवीन रेल्वे स्थानकाचे हे डिझाईन असणार आहे. अत्याधुनिक सुविधांनी युक्त हे रेल्वे स्थानक राहणार आहे. यासाठी 200 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. तसेच  लातूर येथील रेल्वे कोच निर्मिती कारखान्यातून वंदे भारत रेल्वे बरोबरच कोचच्या निर्मितीमुळे मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले.

जालना रेल्वे स्थानकावर कोच देखभाल सुविधांचा विकास (पीटलाईन) च्या कामाचे भूमीपूजन  रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.

व्यासपीठावर केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, राज्याचे सहकार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, आमदार राजेश राठोड, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, भास्कर आंबेकर, माजी आमदार विलास खरात, उद्योजक घनश्याम गोयल, जिल्हाधिकारी   डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना आदींची प्रमुख उपस्थिती होती.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, राष्ट्र हिताच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत दूरदर्शीपणे देशातील प्रमुख शहरांमध्ये असलेल्या प्रत्येक सोयी-सुविधा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणांसह दुर्गम भागापर्यंत उपलब्ध करुन देण्यासाठी आग्रही आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली रेल्वे विभागाचे आधुनिकीकरण करण्यात येऊन सर्वसामान्यांना सेवा अधिक सुलभपणे पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आजघडीला रेल्वे स्थानकांच्या दोनही बाजुला शहर वसलेले आहे. पुढील 25 वर्षांतील शहराचे होणारे विस्तारीकरण लक्षात घेता “रुफप्लाझा” या तंत्रज्ञानाचा वापर करुन शहराच्या दोनही बाजुच्या नागरिकांना रेल्वेच्या सुविधा मिळाव्यात यासाठीही विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगत देशभरातील 50 रेल्वेस्थानकांचा विकास करण्यात येत आहे. यामध्ये जालना येथील स्थानकाचाही समावेश करण्यात आला आहे. भविष्यातील शहर विस्तारीकरण लक्षात घेत 200 कोटी रुपये निधी खर्चून सर्व सुविधांनीयुक्त तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, यादृष्टीने या रेल्वे स्थानकाची उभारणी करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जगभरामध्ये वेगवान रेल्वे म्हणून बुलेट ट्रेनचे नाव समोर येते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनातून भारतीय बनावटीची वेगवान अशी वंदे भारत रेल्वे बनविण्यात भारतीय अभियंत्यांना यश मिळाले आहे. 180 कि.मी. प्रती तास वेगाने धावणारी ही रेल्वे सन 2019 पासून सुरु करण्यात आली असून आतापर्यंत या रेल्वेने 18 लक्ष किलोमीटरची धाव पूर्ण केली आहे. येणाऱ्या काळामध्ये वंदे भारत रेल्वेची अधिक प्रमाणात व गतीने निर्मिती करुन परदेशामध्ये निर्यात करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री वैष्णव यांनी यावेळी सांगितले.

जालना जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार केंद्रीय  रल्वे मंत्री  श्री. वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली पुढील 25 वर्षांचे व्हिजन डोळयासमोर ठेवत राज्यात रेल्वेच्या सुविधा वाढविण्यात येत आहे.  महाराष्ट्रामध्ये रेल्वे विकासासाठी ११ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असुन या निधीतून विविध कामांचे नियोजन करण्यात येत आहे.  जालना जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी विविध प्रकल्प जिल्ह्यात आणण्यात येत आहेत. उद्योजकांचा माल कमी वेळेत व कमी खर्चात पोहोचविण्यासाठी ड्रायपोर्ट प्रकल्प साकारण्यात येत आहे. मल्टी मॉडेल लॉजिस्टीक पार्कची घोषणाही नुकतीची करण्यात आली असुन यासाठी 450 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.  देशामध्ये केवळ तीन ठिकाणीच आयसीटी महाविद्यालय असून यामध्ये जालना जिल्ह्याचा समावेश आहे.  या महाविद्यालयासाठी 66 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आज  100 कोटी रुपयांच्या पीटलाईनचे भूमीपूजनही करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गाच्या बाजुने मुंबई ते नागपूरपर्यंत रेल्वे प्रकल्प करता येईल काय याबाबत पहाणी करण्यात येणार आहे. जालन्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने नुकतीच 45 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारमार्फत निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचेही राज्यमंत्री श्री. दानवे यांनी यावेळी सांगितले.

औरंगाबाद, जालन्यात उद्योग वाढून अधिक रोजगार निर्मिती व्हावी – केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले की, औरंगाबाद व जालना झपाट्याने विकसित होत असलेले जिल्हे आहेत.  जनप्रवासाची रेल्वे एक लोकप्रिय वाहिनी असून रेल्वेचे जाळे संपूर्ण मराठवाडाभर अधिक प्रमाणात विस्तारावे.  जालना, औरंगाबाद या ठिकाणी इलेक्टॉनिक्स उत्पादनाचे उद्योग सुरु करण्याची त्यांनी मागणी करत मराठवाड्यात उद्योग वाढवून अधिक प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

जालना जिल्हयाच्या विकासाचे सर्व विषय मार्गी लावण्यात येतील – पालकमंत्री अतुल सावे

सहकार, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री तथा जालना जिल्हयाचे पालकमंत्री अतुल सावे म्हणाले की, औरंगाबाद व जालना या जवळजवळ असणाऱ्या  ट्विन शहरात  जलदगतीने विकास होत आहे. या दोन्ही शहरांत मोठया औदयोगिक वसाहती आहेत. शिवाय जालन्यात लवकरच ड्रायपोर्टची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे उदयोजक व नागरिकांच्या सुविधेसाठी  रेल्वे कनेक्टीव्हीटीत वाढ होणे आवश्यक आहे. विशेषत: मुंबईला जाणाऱ्या ट्रेन वाढविण्यात याव्यात.  शेंद्रा औदयोगिक वसाहतीत  आयटीचे उदयोग येणे गरजेचे आहे. दरम्यान, जालन्याचा पालकमंत्री या नात्याने या जिल्हयाच्या विकासाचे सर्व विषय निश्चितपणे मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार राजेश टोपे यांचीही समयोचित भाषणे झाली.    कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात दक्षिण रेल्वेचे महाप्रबंधक अरुणकुमार यांनी स्थानकावर कोच देखभाल सुविधांच्या विकास (पीटलाईन) बाबत सविस्तर अशी माहिती दिली. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, नागरिक, महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

महाराष्ट्रासाठी 11000 कोटी रुपयांची रेल्वेसाठीची तरतूद बजेट मध्ये

प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात रेल्वेची प्रगती गतिशील झाली आहे. महाराष्ट्रासाठी 11,000 कोटी रुपयांची रेल्वेसाठीची तरतूद बजेट मध्ये केंद्रा कडून केली गेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रेल्वेची कामे अत्यंत गतीमान झाली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज या दोन्ही स्टेशन्स वर या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ही दोन्ही शहरं अत्यंत महत्त्वाची आहेत.

येथून एलोरा आणि अजिंठा लेणी, दौलताबाद किल्ला, घृष्णेश्वर मंदिर, बीबी का मकबरा इत्यादी लोकप्रिय पर्यटन स्थळांना जाता येते. ह्या शहरात कापूस कापड उत्पादन केंद्र देखील आहेत आणि रेशीम कापडासाठी प्रसिद्ध आहे. मुंबई, नवी दिल्ली, हैदराबाद, तिरुपती इत्यादी महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या अनेक गाड्या या स्थानकांवरून सर्व दिशांना धावतात.

प्रमुख फायदे :

● ही नवीन पिट लाईन पॅसेंजर गाड्या, पार्सल गाड्या आणि फुल रेट शेड्यूल (FTR) ट्रेन्ससाठी देखभाल सुविधा प्रदान करेल, ज्यांची देखभाल सध्या विभागीय मुख्यालय, नांदेड येथे केली जात आहे.

● या नवीन सुविधेमुळे रोलिंग स्टॉकच्या देखभालीमध्ये सुधारणा होईल व अधिक ट्रेन सेवा चालवण्याची संधीही मिळेल.

● कॅमटेक डिझाईन असलेली 16 कोच लांब (400 मीटर) पिट

● लाइन कॅरेज आणि वॅगन आणि ट्रेन लाइटिंग / AC कर्मचान्यांसाठी सेवा इमारत

● डब्यांच्या बाहा स्वच्छतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानासह स्वयंचलित कोच वॉशिंग प्लांट ७ पाणी साठवण्यासाठी सिंक्रोनाइज्ड जॅक हाय प्रेशर कोच

● क्लीनिंग मशीन, एअर कंप्रेसर तसेच ओव्हरहेड टाकीची सुविधा.

● डब्यांच्या बाह्य तपासणी साफसफाई, चार्जिंग आणि पाणी देण्याची सुविधा.