महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त, पवारांना धक्का

सत्तासंघर्षानंतर आता कुस्ती रंगणार!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपचे खासदार बृजभूषण यांचा निर्णय

पुणे ,२ जुलै /प्रतिनिधी :-राज्यातील सत्तासंघर्षाच्या नाट्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय कुस्ती महासंघाने हा निर्णय घेतला असून या संघटनेचे अध्यक्ष भाजपचे खासदार बृजभूषण आहेत. भारतीय कुस्ती संघटनेच्या नवी दिल्लीत झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा पवारांसाठी धक्का मानला जात आहे. जिल्हा संघटना आणि मल्लांच्या तक्रारीनंतर ही कारवाई झाल्याचे कळते. आजी आणि माजी मल्लांकडून गेल्या अनेक वर्षात तक्रारी केल्या जात आहेत. या वर्षी देखील परिषदेविरोधात तक्रारी दिल्या गेल्या होत्या अशी माहिती महासंघाचे सचिव विनोद तोमर यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, महासंघाच्या सूचनांनुसार १५ आणि २३ वयोगटांतील कुस्ती स्पर्धांचे आयोजन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने केली नाही. त्या विरोधात जिल्हा संघटना आणि काही पैलवानांकडून आलेल्या तक्रारींमुळे ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी आगामी काही दिवसात हंगामी समितीची निवड होणार आहे. हीच समिती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुकीसह अन्य बाबींवर लक्ष देणार आहे.

राज्य कुस्तीगीर परिषदेकडून चांगला प्रतिसाद मिळत नव्हता – भारतीय कुस्ती संघटन

यावर भारतीय कुस्ती संघटनेचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून म्हणावा तसा चांगला प्रतिसाद मिळत नव्हता. आम्ही १५ वर्षांखालील स्पर्धेचे आयोजन त्यांना करायला सांगत होतो, पण ऐनवेळी त्यांनी यासाठी नकार दिला. तसेच २०१९ मध्ये २३ वर्षांखालील स्पर्धेचे आयोजन करण्यासही ते तयार नव्हते. याशिवाय राज्य कुस्तीगीर परिषदेबाबत बऱ्याच तक्रारी येत होत्या. यात जिल्हा संघटना आणि खेळाडूंच्या तक्रारींचा समावेश आहे. आमच्याकडून त्यांना संलग्नता रद्द करण्याचा इशाराही देण्यात आला होता, पण त्यांनी दुर्लक्ष केले. अखेर या सर्व तक्रारींची दखल घेत आम्ही त्यांच्यावर कारवाई केली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बृजभूषण यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. यामुळेच आता महासंघाच्या या निर्णयावर राजकीय प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

शरद पवारांचा खुलासा त्यांच्याच शब्दांत 

भारतीय कुस्तीगीर संघाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर काही निर्णय घेतले आहेत. यासंबंधी आज पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधला. भारतीय कुस्तीगीर संघ ही राष्ट्रीय समितीआहे. त्या समितीला प्रशासकीय निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पण त्या संघटनेच्या ज्या राज्य शाखा आहेत त्याप्रमाणे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद ही राज्यशाखा आहे. कोणत्या राज्यशाखेसंबंधी काही तक्रारी असू शकतात, काही कमतरता असू शकतात त्या गोष्टी नजरेस आणून देण्याची जबाबदारी ही राष्ट्रीय संघटनेला टाळता येत नाही. ती जबाबदारी न टाळता एखादी कारवाई केली तर त्या कारवाईसंबंधी वाद होऊ शकतो.

आता जी कारवाई करण्यात आली आहे त्याची चौकशी केली त्यामध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला कोणत्याही प्रकारची नोटीस अथवा पूर्वसूचना किंवा कोणतेही स्पष्टीकरण मागण्यात आलेले नाही. यामध्ये दोन गोष्टी मला सांगायच्या आहेत. मी स्वत: या संघटनेचा अध्यक्ष आहे. महाराष्ट्रात, देशात आणि देशाच्या बाहेर क्रीडा क्षेत्रातील काही संघटनांचा अध्यक्ष गेल्या अनेक वर्षापासून होतो आजही काही ठिकाणी आहे. ज्याप्रमाणे मी कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे तसेच एकेकाळी मी महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचा, देशातील तसेच आशियातील कबड्डी असोसिएशनचा अध्यक्ष होतो, तसेच महाराष्ट्र खो-खो संघटनेचा अध्यक्ष होतो, देशातील आणि आशियातील खो-खो संघटनेचा अध्यक्ष होतो. मी मुंबई क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष होतो, बीसीसीआयचा अध्यक्ष होतो, जगातील सीसीसीआय क्रिकेट संघटनाही अध्यक्ष होतो. या संस्थांमध्ये जेव्हा मी काम करतो तेव्हा माझी एक काम करण्याची पद्धत आहे. मी या कामाचे दोन भाग करतो.

एक म्हणजे खेळाडू, त्याची निवड, खेळाडूसंबंधीच्या बाबी आहेत त्या सगळ्यांपासून मी दूर राहतो. उदाहरणार्थ मी बीसीसीआयचा अध्यक्ष असताना खेळाडूंच्या निवड कमिटीत मी कधीही नव्हतो. तेव्हा त्या कमिटीमध्ये गावसकर आणि अन्य आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्त्वांच्या खेळाडूंची निवड करण्यात आली. याचे कारण मला वाटते की माझ्यासारख्या सार्वजनिक जीवनात, राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी क्रीडा संघटनांच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नये. मग प्रश्न उपस्थित होतो मी अध्यक्ष का होतो. तर मी अध्यक्ष एवढ्यासाठी होतो की या सगळ्या संघटनांचे काही प्रश्न असतात ते प्रश्न राज्य सरकारकडे असतात, केंद्र सरकारकडे असतात. अनेक लोक या संघटना चालवतात पण त्यांचे शासकीय क्षेत्रातील प्रश्न आहेत ते सोडवणे त्यांना सोपे नाही. त्यांच्या तुलनेत कदाचित मला सोपे असू शकते. माझे क्षेत्र सुविधा देणे, खेळाडूंना मदत करणे, खेळाडूंच्या निवृत्तीनंतर काही असलेले प्रश्न सोडविण्यासाठी हातभार लावणे. कबड्डी, खो-खो, किंवा कुस्तीतील खेळाडूंच्या खेळाचा विशिष्ट कालावधी असतो. तो कालावधी संपल्यानंतर पुढच्या वेळचे काय करायचे हे प्रश्न येतात अशावेळी माझा प्रयत्न असतो की त्यांना शासकीय, निमशासकीय, किंवा खासगी कंपन्यांमध्ये या खेळाडूंना संधी मिळावी. देशातील रेल्वेमध्ये आम्ही अनेक खेळाडूंना केंद्र सरकारची मदत घेऊन स्पोर्ट कोट्यातून पाठवले आहे. हे सगळे काम मी बघत असतो खेळाडूंच्या संदर्भात नाही.

कुस्तीगीर परिषदेची सुद्धा हीच स्थिती आहे. या संघटनेचा मी अध्यक्ष असलो तरी राष्ट्रीय स्पर्धा, राज्यातील स्पर्धा आयोजित करण्यासाठी मदत करणे हे माझे काम आहे. तिथे कोण पैलवानाची निवड करायची कोणाला प्रोत्साहित करायचे हे माझे काम नाही. हे काम प्रत्यक्ष सीनिअर खेळाडू जे निवृत्त झाले आहेत त्यांचे काम आहे. खेळाडूंना मदत करणे म्हणजे, काही खेळाडू हे जिल्हा पातळीवर चमकतात, काही राज्यपातळीवर तर काही देश पातळीवर चमकतात. जो राज्यपातळीवर चमकतो तो देशपातळीवर जायला त्याच्यात एक टॅलेंट असू शकते, जो देशपातळीवर चमकतो त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्याची गुणवत्ता असते अशांना मदत करावी लागते. हे सर्व खेळाडू साधारणतः सामान्य कुटुंबातील असतात.

कुस्तीगीरांमध्ये मी ज्यांना सहाय्य केले त्यामध्ये अर्जुन पुरस्कार प्राप्त पै. राहूल आवारे यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर पुढे जाण्याचे पोटेन्शिअल आहे. पै. उत्कर्ष काळे, पै. अभिजीत दटके, पै. किरण भगत, पै. सदगीर अशा सर्व मल्लांना प्रशिक्षण व खुराकासाठी प्रत्येकी १२ लाख रुपये दिले होते. हे काम आयुष्यात पहिल्यांदा मी जाहीर सांगतोय. यासंबंधी एक वादाचा प्रश्न निघाला त्यामुळे या गोष्टी सांगाव्या लागल्या. श्रीरंग राक्षे हा उत्तम खेळाडू जो जखमी झाला. त्यामुळे त्याला वर्षभर वैद्यकीय उपचारासाठी सहाय्याची गरज होती. त्यासाठी २५ हजार रुपये महिना वैद्यकीय खर्चासाठी सहाय्य करण्याची भूमिका घेतली व राबवली. हे काम आमच्यासारख्यांचे आहे बाकीच्यांचे नाही.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेमध्ये या कामासंबंधी कोणाचीही तक्रार नाही. असे असताना बरखास्तीचा निर्णय का घेतला तर कुस्तीगीर परिषदेचे संघटनात्मक व क्रीडाविषयक काम बघणाऱ्यांच्या काही तक्रारी पुणे जिल्ह्यामध्ये आल्या. काही तक्रारी राष्ट्रीय संघटनेकडे गेल्या. या तक्रारीसंबंधी महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेने काय उपाययोजना केली याची माहिती अद्याप मला नाही. पण राष्ट्रीय पातळीवर चौकशी करण्यामागचे कारण विचारले असता त्यांच्या पातळीवर महाराष्ट्र संघटनेच्या कार्यपद्धतीवर काही तक्रारी आल्या व दुसरे कारण राष्ट्रीय संघटनेने स्पर्धा घेण्याचे जे टाईमटेबल करून दिले होते त्यामध्ये महाराष्ट्र संघटनेने जेवढी पावले टाकायला हवी होती तेवढी टाकलेली नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. या सगळ्या गोष्टींमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

या कारवाईमागे कोणते राजकारण आहे अशा बातम्या सुरू होत्या. मात्र यात कोणतेही राजकारण नाही. पक्षीय विषय यात येत नाही. माझ्यासारखे अनेक राजकारणातील लोक क्रीडा संघटनेत आहेत. वेगवेगळ्या विचारांचे व पक्षाचे लोक यात आहेत. पण आम्ही यात कोणतेही राजकारण आणत नाहीत. यामध्ये महाराष्ट्राचे दोन तीन लोक यात महत्त्वाचे आहे. एक मी स्वत: त्यानंतर खासदार रामदास तडस व कुस्तीक्षेत्रात काम करणारे काका पवार तसेच अन्य पदाधिकारी आम्ही एकत्रित बसून राज्यपातळीवर दूरूस्ती करण्याची आवश्यकता असेल तर ती दुरुस्ती करू. काही गैरसमजूतीने निर्णय घेतला असेल तर राष्ट्रीय संघटनेच्या प्रमुखांशीही विचारविनिमय करून यातून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला बाहेर कसे काढायचे याचा विचार करू. यातून एकच गोष्ट सांगू इच्छितो की, राज्यामधील सर्व स्तरावरील कुस्तीपटूंच्या खेळावर, भवितव्यावर या निर्णयाचा यत्किंचितही परिणाम होणार नाही ही खबरदारी आमच्याकडून घेतली जाईल असे मी सर्वांना आश्वस्त करू इच्छितो.