ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी उभा राहणार ‘समृद्धी’चा दुसरा युनिट

प्रतिदिन ५ हजार मेट्रिक टन क्षमता : सभासद नोंदणी करण्याचे आवाहन

जालना,१९ डिसेंबर/ प्रतिनिधी :-अंबड​- घनसावंगी कार्यक्षेत्रात उसाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे व व्हाईस चेअरमन महेंद्र मेठी यांनी कारखान्याची क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी  प्रती दिन ५००० मेट्रिक टन क्षमतेचा युनिट क्रमांक-२ उभारण्यात येणार असून या युनिटची चाचणी गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये घेण्यात येणार आहे. अशी माहिती सतीश घाटगे यांनी दिली आहे.

समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे

अंबड – घनसावंगी तालुक्यात उसाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून अनेक शेतकऱ्यांना बाहेरीच्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊस द्यावा लागतो. बाहेरच्या कारखान्यांना ऊस दिल्यानंतर शेतकऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील कारखान्याच्या तुलनेत कमी भाव मिळतो. तसेच मिळालेला दर विलंबाने मिळतो.  म्हणून आपल्या भागातील शेतकऱ्यांना आपल्या हक्काच्या कारखान्यातच ऊस देता यावा, यासाठी समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे  व संचालक मंडळाने समृद्धी साखर कारखान्याचा युनिट क्रमांक -२ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाची गाळप क्षमता प्रती दिन ५ हजार मेट्रिक टन असणार आहे. या युनिटचे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सभासद व्हावे, असे आवाहन समृद्धी साखर कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.  या नवीन प्रकल्पामुळे अतिरीक्त उसाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली न‍िघणार आहे. तसेच अंबड -घनसावंगी तालुक्यातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या अनेक संधीही निर्माण होतील. समृद्धी साखर कारखान्याच्या या युनिटचा चाचणी शुभारंभ गाळप हंगाम २०२४ -२५ मध्ये होणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी सांगितले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नवीन युनिटचे  सभासद होण्यासाठी  आपल्या गटातील शेतकी विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.