नागपूर जवळच्या बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोझिव कंपनीत भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू

नागपूर ,१७ डिसेंबर  /प्रतिनिधी :-नागपूर जवळच्या बाजारगाव येथील एका मोठ्या सोलर एक्सप्लोझिव कंपनीत भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार या दुर्दैवी घटनेत ९ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीतील कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंग करतेवेळी हा स्फोट झाला.

या कारखान्यात मोठ्या प्रमाणात दारुगोळा तसेच रसायने असल्यामुळे या घटनेत मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाल्याची भीती वर्तवली जात आहे. या स्फोटाची तीव्रता किती होती याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी यात एक इमारत या घटनेत उध्वस्त झाल्याचं समजतं.

या घटनेची माहिती मिळतात परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आत पोहचूनच स्थिती स्पष्ट होऊ शकेल, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी दिली.

मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

नागपूर येथील सोलर कंपनीत घडलेल्या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रध्दांजली वाहिली. तसंच या दुख:द प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे असल्याचेही ते म्हणाले. स्फोट झालेली कंपनी ही संरक्षम दलासाठी ड्रोन आणि स्फोटके निर्माण करणारी कंपनी असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, नागपूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्कात आहे. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना ५ लाख रुपये मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल, त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.

बाजारगाव दुर्घटनास्थळाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; मृतांच्या नातेवाईकांचे केले सांत्वन

नागपूर जवळील बाजारगाव येथील सोलर इंडस्ट्री इंडिया लिमिटेडच्या परिसरातील दुर्घटनास्थळाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली.

रात्री सव्वा नऊच्या सुमारास नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर तेथूनच मुख्यमंत्री दुर्घटनास्थळाकडे रवाना झाले. यावेळी त्यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी करून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाइकांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले.कारखान्यातील अधिकाऱ्यांकडून आणि पोलिसांकडून घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. यावेळी विशेष पोलीस महानिरिक्षक  छेरिंग दोरजे,जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण हर्ष पोद्दार, उपविभागीय अधिकारी शिवराज पडोळे व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.