समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या सुस्साट वेगाला कारवाईचा ब्रेक

महिनाभरात ९ लाखांच्या दंडाची वसुली

नागपूर ,१२ जानेवारी  / प्रतिनिधी :- समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होऊन एक महिना पूर्ण झाला आहे. मात्र, समृद्धी महामार्गाने प्रवासाची वेळ वाचत असला तरी वाहनांच्या अपघातांच्या वाढत्या संख्येने चिंता वाढली होती. अतिवेगाने धावत असलेल्या वाहनांना लगाम लावण्यासाठी पोलिसांनी स्पीडगनच्या माध्यमातून कारवाईस सुरू केली आहे. विदर्भात ६५०वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यातून ९ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

प्रशस्त महामार्गामुळे वाहनधारकांना कमी वेळात लवकर प्रवास करणे शक्य होत आहे. मात्र, प्रवासादरम्यान वाहनांचा वेग हा प्रति तास १२० हून अधिक असतो. त्यामुळे वाहने अनियंत्रित होऊन अपघात घडत आहेत. सुस्साट वेगाने धावणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवण्याची प्राथमिक जबाबदारी पोलीस खात्यावर देण्यात आली आहे. राज्य महामार्ग पोलिसांनी स्पीडगनद्वारे गेल्या महिनाभरात ६५० वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक कारवाई करण्यात आली. वाशिम जिल्ह्याच्या हद्दीत १७३ वेगवान वाहनांवर कारवाई करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यात ४५वाहनांवर कारवाई करण्यात आली. तसेच नो पार्किंगसह महामार्गावर सेल्फी काढणाऱ्या वाहन चालकांवरदेखील कारवाई करण्यात आली आहे.