जरांगेंवर रुग्णालयात उपचार सुरु; तरीही म्हणतात सभा घेणारच!

१७ डिसेंबरला पुढील भूमिका ठरवण्यासाठी आंतरवाली सराटीत घेणार सभा

बीड,१२ डिसेंबर / प्रतिनिधी :-  मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील सध्या त्यांच्या चौथ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौर्‍यावर आहेत. राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी मुदत दिल्याचे ते सांगतात. त्यानंतर आक्रमक होण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. दरम्यान, १७ डिसेंबरपर्यंत ते महाराष्ट्र दौरा करत मराठा बांधवांच्या भेटीगाठी घेणार आहेत.

काल बीडच्या अंबेजोगाई येथील सभेदरम्यान जरांगेंची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना थोरात रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना ताप आला होता आणि प्रचंड अशक्तपणा देखील असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. येथील डॉक्टरांनी त्यांना तब्येतीची काळजी घेण्यासाठी पुढील दौर्‍यावर न जाण्याचा सल्ला दिला. तरीही जरांगेंनी या सभांना उपस्थित राहणार असल्याची भूमिका घेतली आहे.

मनोज जरांगे कालपासून बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. काल त्यांची अंबेजोगाईमध्ये सभा पार पडली. तसेच, त्यांच्या आजच्या दौऱ्यानुसार केज तालुक्यातील बोरी सावरगावमध्ये दहा वाजता पहिली सभा नियोजित करण्यात आली होती. त्यानंतर एक वाजता धारूर आणि तीन वाजता माजलगावमध्ये सभा नियोजित आहे. त्यांच्या दौऱ्याचा समारोप माजलगावमधील जाहीर सभेने होणार आहे. या सभांच्या वेळापत्रकात काहीसा बदल होणार असला तरी सभा होणारच यावर जरांगे ठाम आहेत.

दौऱ्याचा तब्येतीवर झाला परिणाम…

मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे सतत वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. त्यांच्या अनेक सभा पहाटेपर्यंत देखील चालल्या. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांची प्रकृती खालावली आहे. सोमवारी सुरुवातीला धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील माकणी-करजगाव येथील सभेत त्यांची प्रकृती खालावली, त्यामुळे त्यांनी बसूनच भाषण केले. पुढे बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील सभेत देखील त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी येथे देखील बसूनच भाषण केले. त्यानंतर त्यांना तात्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरीही मनोज जरांगे आजच्या नियोजित सभांना उपस्थित राहण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याची माहिती संयोजकांकडून देण्यात आली आहे.