नवाब मलिकांवरून महायुतीत मतभेद:मलिकांना महायुतीत घेण्यास देवेंद्र फडणवीसांचा विरोध

नागपूर ,७ डिसेंबर  /प्रतिनिधी :-वैद्यकीय कारणावरुन जामिनावर असेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार नवाब मलिक हे आज अजित अजित पवार गटात सामिल झाले. आज सुरु झालेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नवाब मलिक यांनी हजेरी लावली होती. यावेळी नवाब मलिक कोणत्या गटात सामिल होतात याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. सभागृहात नवाब मलिक हे सत्ताधाऱ्यांच्या बाजूनने जाऊन बसल्यावर ते अजित पवार गटात सामिल झाल्याचं स्पष्ट झालं. मात्र यामुळे नवाब मलिक यांच्यावर आरोप केल्या भाजपची मात्र चांगलीच पंचाईत झाली. भाजपनेच देशद्रोहासारखे आरोप केलेले नवाब मलिक भाजप प्रणिसत सरकारच्या बाजूला जाऊन बसल्याने भापवर टीका होऊ लागली. यावरुन उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहित नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास विरोध केला आहे.

सत्ता येते सत्ता जाते, पण देश महत्वाचा आहे. त्यांना देशद्रोहाचा आरोपाखाली अटक झाली होती. त्यामुळे नवाब मलिक यांना महायुतीत सामवून घेता कामा नये, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटलं आहे. त्यांनी याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांमधील मतभेद समोर अल्याने, राजकीय वर्तुळात त्याची चर्चा रंगली आहे.

नवाब मलिक यांच्यावर असेलेले आरोप

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहासारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हसीना पारकर, सलीम पटेल, १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर या या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बेकायदेशीर रित्या हडपल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या महिलनेने १९९९ साली सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ एटर्नी जारी केली होती. या द्वारे सलीम पटेलकडून या जमिनीवर असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमन तोडगा काढणे अपेक्षित होते. मात्र, सलीम पटेल याने याचा दुरुपयोग करत हसीना पारकरच्या सूचनेनुसार गोवावाला कंपाउंडमधील जमीन नवाब मलिक यांच्या ‘सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीला विकली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील जागा भाडेतत्वावर देऊन त्यांतून आलेल्या पैशामंधून वांद्रे, कुर्ला येथील फ्लॅट्स आणि उस्मानाबादमधील शेतजमीन खरेदी केली आहे, असा आरोप ईडीकडून नवाब मलिक यांच्यावर करण्यात आला आहे.

उत्तर द्या सुपर सीएम!-अंबादास दानवे 

ज्यांच्यावर आपण आरोपांच्या फैरी झाडल्या, दाऊदशी व्यवहार केल्याचे सांगत जेलात धाडले, आज तेच आपल्याला इतके प्रिय कसे झाले? की ते ‘नवाबी थाटात’ मांडीला मांडी लावून बसताना तुम्हाला ‘आपले’ वाटायला लागले आहेत? तुमच्या बाजूने बसले म्हणून ते आता ‘ओके’ आहेत की हा तुमच्या भाजप वॉशिंग मशीनचा कमाल आहे?

चोहो बाजूनी टीका झाल्यावर आलेलं शहाणपण आहे!

तरीपण सत्ताधारी बाकांवर बसून हे पूर्ण महाराष्ट्र ला दिसलं की नवाब मलिक सरकार बरोबर आहे.

जो बुंद से गई…

शिंदे गटानेही सुनावलं

फडणवीस यांच्या पत्रानंतर शिवसेनेच्या शिंदे गटानेही कडक भूमिका घेतली आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट म्हणाले, एखाद्या व्यक्तीवर इतक्या गंभीर स्वरुपाचे आरोप असून त्यांना अटक झालेली असतानाही ते विधानसभेत सत्ताधारी बाकावर बसल्याने लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आम्ही नवाब मलिक यांना स्वीकारलं अशी भावना सर्वसामान्य जनतेची झाली आहे. त्यांना आपल्या पक्षात घेण्याबाबतचा निर्णय अजित पवारांचा असला तरी त्यांच्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल असं होता कामा नये.

मतभेदांनंतर अजित पवार गटाचं स्पष्टीकरण

नवाब मलिक प्रकरणावरून फडणवीस यांचं पत्र आणि शिंदे गटाची भूमिका पाहता महायुतीत मतभेद निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. अशातच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण देणारी एक पोस्ट मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर केली आहे. तटकरे यांनी म्हटलं आहे की, आमदार नवाब मलिक हे आमचे अनेक वर्षांपासूनचे ज्येष्ठ सहकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मधल्या कालावधीत घडलेल्या घडामोडींशी त्यांचा कुठलाही संबंध नाही. आजारपणाच्या मुद्द्यावर त्यांना जामीन मिळाल्यानंतर जुने सहकारी म्हणून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेतली. परंतु, आम्ही त्यांच्याशी कुठलीही राजकीय चर्चा केलेली नाही. आज विधानसभेत आल्यानंतर जुन्या सहकार्‍यांशी त्यांचा संवाद आणि भेट होणं स्वाभाविक आहे.

नवाब मलिक अखेर सत्ताधार्‍यांच्या बाकावर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पाच महिन्यांपूर्वी फूट पडली तेव्हा अनेक आमदारांनी अजित पवारांची साथ दिली तर काहीजण शरद पवारांच्या साथीला राहिले. या संपूर्ण उलथापालथीत राष्ट्रवादीचे विश्वासू नवाब मलिक मात्र मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरुंगात होते. त्यांच्या आजारपणामुळे त्यांचा जामीन मंजूर करण्यात आला. ते बाहेर येताच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी त्यांना आपल्याला पाठिंबा द्यावा याकरता गळ घातली होती. मात्र, नवाब मलिकांची भूमिका अनेक दिवस स्पष्ट होत नव्हती.

ऑक्टोबर महिन्यात निवडणूक आयोगात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान अजित पवार गटाने आपल्याकडे राष्ट्रवादीच्या एकूण ५३ आमदारांपैकी ४२ आमदार पाठीशी असल्याचा दावा केला होता. यातील ४१ आमदारांची यादी सोशल मीडियावर व्हायरल होत होती, मात्र ४२वे आमदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत होता. अजित पवार गटाने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली तरी नवाब मलिक हेच ते ४२ वे आमदार आहेत, असे सांगण्यात येत होते. मात्र नवाब मलिकांनी यावर स्पष्टता दिली नव्हती.