मराठवाड्याला पावसाचा तडाखा; वीज कोसळून एक ठार, पीक पंचनाम्याचे प्रशासनाचे आदेश

छत्रपती संभाजीनगर ,२७ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसाने खरीप आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान केले आहे. वादळात कापूस, मका, हरभरा आणि ज्वारी पिके आडवी पडली आहेत. विजांच्या कडकडाटासह रविवारी मध्यरात्रीपासून पाऊस सुरू होता. विभागात सोमवारी सकाळपर्यंत जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. विभागात १०७ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून हिंगोलीत वीज अंगावर पडून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळपर्यंत विभागात ४०.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्याला दोन दिवस अवकाळी पावसाने झोडपले असून पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत अजून भर पडली आहे. राज्याला पुन्हा एकदा गारपीटसह आलेल्या अवकाळी पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. अवेळी पडलेल्या या पावसाने हातातोंडाशी आलेल्या घास हिरावून नेला आहे. विदर्भातील बहुतांश भागात शेतीपीकांचं मोठं नुकसान झालं आहे. विशेषता विदर्भातील हरभरा, तूर सोयाबीन, कापूस गहू इत्यादी पिकांना मोठा फटका बसला आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात पुढील दोन दिवस येलो अलर्ट जारी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांवर घोंगावणारं हे संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे. खबरदारी म्हणून शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याच्या सुचना हवामान खात्याकडून करण्यात आल्या आहेत.

परतीचा पाऊस झाला नसल्यामुळे रब्बीचे क्षेत्र कमी आहे. ज्वारी, हरभरा, गहू या रब्बी पिकांसह तूर आणि कापसू या खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. फुटलेला कापूस ओला झाला असून तुरीची झाडे आडवी पडली आहेत. वादळामुळे अनेक भागात ऊस आडवा पडला आहे. ढगाळ वातावरण कायम असून पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे विभागातील १०७ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. पाऊस आणि गारपीट झाल्यानंतर विभागीय आयुक्तांनी जिल्हा प्रशासनांना पिकांचे नुकसान आणि मालमत्तेच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. विभागात कापसाचे सर्वाधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. याबाबत दोन दिवसात पंचनामे पूर्ण करुन नुकसान जाहीर करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. मराठवाड्यात सहा जिल्ह्यात पावसाचा अधिक जोर होता. जालना (७०.७मिमी), परभणी (६५) आणि हिंगोली (६५.८मिमी) अशी अतिवृष्टी झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर (६०.८ मिमी), बीड (२७.२), लातूर (१.५) आणि नांदेड (३६.५ मिमी) अशी जिल्हानिहाय पावसाची नोंद झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात पाऊस झाला नाही. दरम्यान, तिसऱ्या दिवशीही ढगाळ वातावरण कायम असून दोन दिवस गारपिटीसह पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे. अतिवृष्टी झालेल्या भागातील ओढे आणि नाल्यांना पूर आला आहे. पिकांसाठी हा पाऊस पोषक नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

हिंगोलीत एक ठार, जनावरे दगावली

अवकाळी पावासाचा फटका हिंगोली जिल्ह्यालाही बसला आहे. चिमेगाव (ता. औंढा नागनाथ) येथील राजू शंकरराव जायभाये (वय ३२) या तरुणावर पहाटे वीज कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. तर गोजेगाव येथील विष्णू सीताराम नागरे (वय २५) हा तरुण जखमी झाला आहे, अशी माहिती विभागीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. वीज पडून विभागात लहान २३ आणि मोठी नऊ अशी एकूण ३२ जनावरे दगावली आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आठ, जालन्यात १८, हिंगोलीत तीन आणि नांदेडमधील तीन जनावरांचा त्यात समावेश आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचा जोर दुसऱ्या दिवशीही कायम होता. जिल्ह्यातील ३२ मंडळात अतिवृष्टी झाली आहे. उस्मानपुरा, भावसिंगपुरा, कांचनवाडी, चौका, कचनेर, पंढरपूर, आडूळ, बिडकीन, पाचोड, मांजरी, भेंडाळा, तुर्काबाद, वाळूज, डोणगाव, आसेगाव, शिवूर, गारज, महालगाव, जानेफळ, कन्नड, चापानेर, देवगाव रंगारी, पिशोर, नाचनवेल, चिंचोली लिंबाजी, वेरुळ, सुलतानपूर, बाजारसावंगी, गोळेगाव, आमठाण, बोरगाव आणि फुलंब्री या मंडळांचा त्यात समावेश आहे.