शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल सादर करा -पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

धुळे, दि. 11 : शिंदखेडा तालुक्यात सततचा पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल कृषी विभागाने सादर करावा. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिंदखेडा येथे ऑक्सिजनयुक्त बेड तयार करावेत, असे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.

पालकमंत्री श्री. सत्तार आजपासून धुळे जिल्हा दौऱ्यावर आहेत. दुपारी शिंदखेडा येथील तहसील कार्यालयातील सभागृहात ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’, महाराजस्व अभियान, सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आयोजित तालुकास्तरीय बैठकीच्या वेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुसुमताई निकम,  मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार सुदाम महाजन, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे आदी उपस्थित होते.

यावेळी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेचे किट वितरण, कोरोना कालावधीत उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल आशा स्वयंसेविका यांचा सत्कार करण्यात आला. तसेच महाराजस्व अभियानांतर्गत विविध प्रकारच्या दाखल्यांचे वितरण पालकमंत्री श्री. सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले.

पालकमंत्री श्री. सत्तार म्हणाले, सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने पंचनामे करून अहवाल सादर करावा. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे राहिले असतील त्यांचेही पंचनामे तात्काळ पूर्ण करावेत. या कामाचा उपविभागीय अधिकारी डॉ. बांदल यांनी आढावा घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेची तालुक्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. या मोहिमेची अंमलबजावणी करताना समाजातील सर्व घटकांचा समावेश करून घ्यावा. तसेच या मोहिमेची वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती करावी. जनजागृतीसाठी स्थानिक बोलीभाषेचा वापर करावा, असेही निर्देश त्यांनी दिले.

उपविभागीय अधिकारी डॉ. बांदल यांनी महाराजस्व अभियान, कोरोना विषाणू प्रतिबंध साठी केलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सोनवणे यांनी शिंदखेडा  तालुक्यात पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती दिली. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भूषण मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विनय पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. हितेंद्र देशमुख, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री. बीडगर यांनी कोरोना विषाणू आणि ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेची माहिती दिली. तहसीलदार सुदाम महाजन यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. या वेळी लोकप्रतिनिधी, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

दत्ताणेत शेतकऱ्यांशी संवाद

तत्पूर्वी पालकमंत्री श्री. सत्तार यांनी दत्ताणे शिवारात झालेल्या नुकसानीची पाहणी करीत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.