सिद्धेश्वर धरण पर्यटन क्षेत्र विकसित करण्याच्या पहिल्या टप्प्यातील कामास निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई,२३ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण पर्यटन क्षेत्र टप्या-टप्याने विकसित करण्यात करावे. पहिल्या टप्प्यात बोटिंग आणि उद्यान विकसित करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या कार्यालयात आयोजित बैठकीत हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण पर्यटन क्षेत्र विकसित करण्याबाबत सादरीकरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.  बैठकीस आमदार चंद्रकांत नवघरे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पर्यटन विभागाचे अवर सचिव मदन सोंडे, संचालक डॉ. बी. एन. पाटील, उपस्थित होते. तर हिंगोलीचे  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी सांगितले की, पर्यटन क्षेत्र विकसित करताना या ठिकाणी होणाऱ्या कामांवर देखभाल, दुरुस्तीचा खर्च मर्यादित असावा.  या बरोबरच कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदारही व्हावीत. सिद्धेश्वर धरण पर्यटन क्षेत्र विकसित झाल्यास या भागात पर्यटकांची संख्या वाढून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. हे पर्यटन क्षेत्र नांदेड, परभणी, वाशीम जिल्ह्यांना जवळ असल्याने या भागातील स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

वास्तूविशारद श्री. कुलकर्णी यांनी सादरीकरणातून सिद्धेश्वर धरण पर्यटन क्षेत्रात करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली.